लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव: तालुक्यातील आव्हाणे येथील ६५ वर्षाच्या वृद्धाचा गिरणा नदीपात्रातून जात असताना पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाला. आव्हाणे येथे मधुकर ढोले (६५, आव्हाणे, जळगाव) हे कुटुंबासह वास्तव्याला होते. शेतीचे काम करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.

ढोले हे नेहमीप्रमाणे शेतात जाण्यासाठी घरातून निघाले. गावानजीकच्या गिरणा नदीपात्रातून जात असताना त्यांचा पाय घसरला. त्यात ते नदीपात्रातील खड्ड्यात बुडाले. ते पाण्यात पडल्यानंतर नदीकाठावर असलेल्या तरुणांनी नदीपात्रात उडी घेत त्यांना बाहेर काढले. खासगी वाहनातून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.

आणखी वाचा-कुठे कुठे माफी मागणार? छगन भुजबळ यांचा शरद पवार यांना सवाल

याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. ढोले यांच्यामागे तीन मुलगे, दोन विवाहित मुली असा परिवार आहे. दरम्यान, गिरणा नदीपात्रातून अवैधपणे वाळूचा मोठ्या प्रमाणावर उपसा केला जातो. यामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. ते आता धोकादायक ठरत आहेत.