जळगाव : जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे वेध लागल्यानंतर शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) पाचोऱ्यातील आमदाराने सर्वात आधी बंडाची भाषा करून आधीच भाजपला आव्हान दिले आहे. तेवढ्यावरच न थांबता एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री झाले नाहीत, हे दुर्दैव असल्याची खंत व्यक्त करून त्यांनी भाजप नेत्यांवर पुन्हा एकदा टिकास्त्र सोडले आहे.

जळगाव जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा माहोल चांगलाच तापला असून, महायुतीतील मतभेद उफाळून आले आहेत. शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील हे भाजपशी युती करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे संकेत देत आहेत. मात्र, त्याचवेळी त्यांच्या पक्षाचे आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा-भडगावमध्ये शिवसेना स्वबळावर निवडणूक लढणार असल्याची घोषणा करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका महायुतीने एकत्र लढवल्यानंतर भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यातील समन्वय चांगला होता. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यानंतर आता तिन्ही पक्षांतील मतभेद वाढताना दिसत आहेत. उमेदवारी वाटप, स्थानिक पातळीवरील वर्चस्व आणि संघटनात्मक हितसंबंध यावरून महायुतीत तणाव वाढण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

पाचोऱ्यात काही वर्षांपासून शिवसेनेची (एकनाथ शिंदे) एकहाती सत्ता असताना, भाजपने सर्व विरोधकांना पक्षात प्रवेश देऊन विद्यमान आमदार किशोर पाटील यांना शह देण्याच्या हालचाली अलीकडे वाढविल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, माझ्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढणाऱ्यांच्या बरोबर राहून मी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढू शकत नाही. पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांकडून मृत्यू ओढवून घेण्यापेक्षा समोरून त्यांच्याशी लढणे केव्हाही चांगले. किमान सावध तरी राहता येईल, असेही आमदार पाटील यांनी म्हटले होते. त्यानंतर आता आमदार पाटील यांनी भाजपवर निशाणा साधत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले आहे. आजवरच्या इतिहासात असा मुख्यमंत्री मी पाहिला नाही, जो नायक चित्रपटातील नायकासारखा जनतेसाठी झटत होता. शिंदे यांनी अडीच वर्षांच्या काळात लोकांसाठी मनापासून आणि दिलखुलासपणे काम केले. लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपयांचे मानधन सुरू केले आणि ते वाढवून २१०० रुपये देण्याची घोषणा केली. दुर्दैवाने त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळाले नाही, अशी खंत आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केली. पाचोऱ्यातील शिंदे गटाच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.

त्यांनी विकास निधी वाटपावरूनही महायुती सरकारवर थेट टीकास्त्र सोडले आहे. महायुती सरकारला सत्तेत येऊन वर्ष पूर्ण होत असले तरी आमदारांना विकासकामांसाठी एक पैसाही मिळालेला नाही. गेल्या वर्षभरात आम्हाला कोणताही निधी दिला गेला नाही. या परिस्थितीत आमचा एकमेव आधार पालकमंत्री गुलाबराव पाटील राहिले आहेत. विकास कामांसाठी आम्ही त्यांच्याकडेच अपेक्षेने पाहत असतो, असे सांगत त्यांनी महायुतील सरकारवर रोखठोक शब्दांत नाराजी व्यक्त केली. भाजपच्या धोरणांवर टीका करताना आमदार पाटील यांनी बंडखोरी करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या मुद्द्यावर देखील तीव्र आक्षेप घेतला. दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही आमदार किशोर पाटील यांच्या तक्रारींचे समर्थन करत आपली भूमिका स्पष्ट केली. भाजपने माझ्या मतदारसंघात चांगले काम केले असले, तरी पाचोरा मतदारसंघात काम केले नसल्याचे त्यांनी मान्य केले.