नाशिक – प्रशासकीय पातळीवर सेवा सप्ताहातंर्गत विविध कामांचा गाजावाजा केला जात असतांना पोषण आहारापासून मुले वंचित राहत असल्याने महिला व बाल विकास विभागाच्या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने इगतपुरी पंचायत समिती कार्यालयात अंगणवाडी भरवून आंदोलन करण्यात आले. वंचित बालकांना पोषण आहार देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
इगतपूरी तालुक्यातील कुरुंगवाडीजवळील मारुतीवाडी येथे ३० पेक्षा जास्त आदिवासी कुटूंब राहतात. याठिकाणी मूलभूत सुविधा नाहीत. अंगणवाडीही नाही. मारुतीवाडीतील बालकांची नोंद कुरंगवाडी येथील गावात आहे. मारुतीवाडी आणि कुरुंगवाडी यांच्यात तीन किलोमीटरचे अंतर आहे. त्यामुळे तीन ते सहा वयोगटातील बालके पोषण आहार घेण्यासाठी कुरुंगवाडीत जात नाहीत.
सर्व परिसर हा वनविभागाच्या अखत्यारीत असला तरी बिबट्यांचा वावर परिसरात आहे. याशिवाय इतर वन्यजीवांची भीती असल्याने मुलेही अंगणवाडीमध्ये जात नाहीत. मारुतीवाडीत ३५ मुले आहेत. त्यांना आहार वाटप केला जात नाही. याबाबत अनेकदा बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने तक्रार करण्यात आली. परंतु, सदर बालकांना पोषण आहार वाटप केला गेला नाही.
जिल्हा महिला बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडेही तक्रार करुन उपयोग झाला नाही. बालकांना आजही पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे. दोन ऑक्टोबरपर्यंत शासनाने सेवा पंधरवडा जाहीर केला आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रम सुरू करत प्रशासनाने स्वतःची पाठ थोपटून घेतली असली तरी अनेक आदिवासी पाड्यांवर बालकांना पोषण आहारही मिळत नसल्याकडे एल्गार कष्टकरी संघटनेने लक्ष्य वेधले आहे.
वारंवार इशारा दिल्यानंतरही कार्यवाही होत नसल्याने निषेध करण्यासाठी एल्गार संघटनेच्या वतीने बालविकास अधिकारी कार्यालयात अंगणवाडी केंद्र सुरू करण्याचा इशारा देण्यात आला होता. परंतु, तरीही दखल घेण्यात न आल्याने बुधवारी बालविकास अधिकारी कार्यालयात एल्गार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सर्व बालकांना घेऊन अंगणवाडी भरवली. संघटनेचे प्रमुख भगवान मधे यांनी, आंदोलकांशी प्रकल्प अधिकारी यांनी चर्चा केली असून परिसरातील अंगणवाडी सेविकांकडून अहवाल मागवल्याचे नमूद केले.
दरम्यान या विषयी बोलतांना बालविकास प्रकल्प अधिकारी भारती गजगे यांनी सांगितले, कुरूंगवाडीपैकी मारूतीवाडी येथील शून्य ते सहा वयोगटातील बालकांच्या पोषण आहाराबाबत एल्गार संघटनेचे प्रतिनिधी व लाभार्थी यांच्या समवेत चर्चा केली अंगणवाडी सेविकांचे सर्व कामकाजाची सखोल तपासणी करून चुकीच्या बाबींवर कठोर प्रशासकिय कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देत गुरूवारी सकाळी दहा वाजता संबंधित अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहत प्रश्नाची सोडवणुक करतील असे आश्वान दिले.