नाशिक – रेल्वेच्या मासिक हंगामी तिकीट (एमएसटी) पासधारक डब्यात आसन रिक्त असल्यास ऐनवेळी खिडकीतून तिकीट घेणाऱ्यांना या डब्याच्या श्रेणीनुसार तिकीटाच्या फरकाची रक्कम भरून प्रवासाची मुभा देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र अमृतकर यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे. पंचवटी एक्स्प्रेसमध्ये एमएसटी डब्यात जागा रिक्त असूनही पासधारक दादागिरी करतात. परिणामी रेल्वेचेही नुकसान होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

पासधारकांच्या (एमएसटी) डब्यात शनिवार, रविवार आणि काही वेळा या दोन दिवसांच्या व्यतिरिक्त सोमवार ते शुक्रवार प्रवाशांची संख्या कमी असते. या बोगीतील आसन रिक्त असतात. अनेक प्रवासी तिकीट अद्ययावत करून अर्थात प्रवासाच्या फरकाची रक्कम भरून रिक्त आसनावरून प्रवास करू इच्छितात. यामुळे रेल्वेचा महसुली तोटा कमी होऊ शकतो. पर्यायाने रेल्वेच्या उत्पन्नात भर पडू शकते. त्यामुळे एमएसटी धारकांकडून सामान्य प्रवाशांवर होणाऱ्या नाहक दादागिरीला आळा बसेल, असे अमृतकर यांनी रेल्वे मंत्रालयाच्या निदर्शनास आणले आहे.

रेल्वे प्रवाशांना एमएसटी पासधारकांच्या दादागिरीला सामोरे जावे लागू नये, शिवाय बुडणारा महसूल टाळण्यासाठी तत्काळ नियमावलीत बदल करून मूठभर पासधारकांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय पाहावी. तसेच एमएसटीधारकांच्या तुलनेत रेल्वेला तिकिटामधून अधिक महसूल मिळणार आहे, हा मुद्दा त्यांनी रेल्वे मंत्रालयासमोर मांडला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 ‘पंचवटी‘त पासधारकांची दादागिरी ? रवींद्र अमृतकर यांना पंचवटी एक्स्प्रेसमध्ये पासधारकांच्या दादागिरीचा अनुभव आला. या गाडीत वातानुकूलित चेअरकार श्रेणीत कोच एमएसटी सी – २ मध्ये निम्म्याहून अधिक आसन रिकामे असताना मासिक पासधारकांनी दादागिरी करून तिकीट निरीक्षकांवर दबाव टाकला. आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून तिकीट अद्ययावत करण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु, संबंधितांनी सी दोन बोगीत बसण्यास त्यांना मज्जाव केला. अखेर सी १ बोगीत म्हणजे एक तासाने या डब्यात नोंदणी करून न आलेल्या प्रवाशाची जागा त्यांना मिळाली.