नाशिक – महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या कालावधीत दर महिन्याला मिळणारे निवृत्तीवेतन हा मोठा आधार असतो. निवृत्ती वेतनावर त्यांचे महिन्याचे संपूर्ण गणित अवलंबून असते. वयाच्या साठीनंतर आजारपणाचा खर्च अधिक असतो. निवृत्तीवेतनातील बराचसा पैसा आजारपणावरच खर्च होतो. त्यामुळेच कधी निवृत्तीवेतन बँकेत जमा होण्यास उशीर झालाच तर, सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी बेचैन होतात.
महिन्याच्या एक तारखेलाच बँकेत जाऊन निवृत्तीवेतन जमा झाले की नाही, याची चौकशी केली जाते. दरवर्षी नियमितपणे निवृत्तीवेतन मिळण्यासाठी राज्य सरकारच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एक गोष्ट करणे भाग असते. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात निवृत्तीधारकांना ही गोष्ट करावीच लागते. अन्यथा डिसेंबरपासून पुढील महिन्यांचे निवृत्तीवेतन बंद पडण्याचा धोका असतो.
राज्य सरकारच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र कोषागार नियम १९६८ च्या नियम ३३५ नुसार एक नोव्हेंबर रोजी हयात असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. याशिवाय कुटुंब निवृत्तीवेतनधारकाने ज्यामुळे निवृत्तीवेतन बंद होईल, अशी घटना घडली नाही, असे प्रमाणपत्र तसेच प्रत्येक महामंडळे किंवा ज्या संस्थाना शासकीय मदत मिळते, अशा संस्थेमध्ये सेवा न केल्याबाबतचे प्रमाणपत्र नोव्हेंबरमध्ये सादर करणे आवश्यक आहे.
त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय सेवानिवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी या वर्षीच्या हयातीच्या दाखल्यांच्या याद्या जिल्ह्यातील निवृत्तीवेतन मिळणाऱ्या सर्व बँकांना जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील शासकीय निवृत्तीवेतन धारकांनी प्रलंबित हयातीचे दाखले त्वरीत नजीकच्या उपकोषागार आणि कोषागार कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन नाशिक जिल्हा कोषागार अधिकारी सचिन धस यांनी केले आहे.
नाशिक जिल्ह्यातील निवृत्तीवेतनधारक ज्या बँकेतून निवृत्तीवेतन घेत असतील, त्यांच्यासाठी जीवन प्रमाण प्रणाली, बँकेच्या सक्षम प्राधिकाऱ्यासमोर नोंदवहीत स्वाक्षरी करणे किंवा विहित नमुन्यातील प्रमाणपत्र कोषागार कार्यालयास सादर करणे, असे तीन पर्याय उपलब्ध आहेत. त्या तीन पर्यायांपैकी एका पर्यायाचा वापर करून निवृत्तीवेतन धारकांनी हयात असल्याबाबतची औपचारिकता पूर्ण केल्यावर त्यांना डिसेंबर २०२५ चे निवृत्तीवेतन किंवा कुटुंबनिवृत्तीवेतन दिले जाईल.
तथापि, ज्या निवृत्तीधारकांनी अद्यापही हयातीच्या प्रमाणपत्राबाबत वरील तीन पर्यायांपैकी एकाही पर्यायाचा वापर केला नसल्यास त्यांना हयातीच्या प्रमाणपत्राअभावी डिसेंबर २०२५ पासून निवृत्तीवेतन प्रदान केले जाणार नसल्याचा इशारा नाशिक जिल्हा कोषागार अधिकारी धस यांनी दिला आहे. सर्व निवृत्तीवेतनधाकांनी संबंधित बँक शाखा व्यवस्थापक यांच्याकडे जावून जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत सादर करण्यात आलेल्या हयातीच्या दाखल्याच्या यादीमध्ये स्वाक्षरी करावी अथवा जीवन प्रणालीद्वारे तयार होणारे प्रमाणपत्र कोषागार कार्यालयात अथवा नजीकच्या उपकोषागार कार्यालयात जमा करावयाचे आहे.