नाशिक – सात वर्षाच्या मुलीला मारून पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेतला. नाशिकरोड परिसरातील जेलरोड भागात ही घटना घडली.स्वप्नील गायकवाड (३६) असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. उपनगर पोलीस ठाण्यात ते शिपाई म्हणून कार्यरत होते. वर्षभरापूर्वी त्यांची पत्नीशी फारकत झाल्याचे सांगितले जाते. तेव्हापासून ते शिवाजीनगरच्या मॉडेल कॉलनीतील मंगलप्रभात इमारतीत आई-वडील आणि मुलगी भैरवीसह वास्तव्यास होते. या इमारतीपासून हाकेच्या अंतरावर गायकवाड यांची योगमाला इमारतीत स्वत:ची सदनिका आहे.
मंगळवारी दुपारी घरी आल्यानंतर ते मुलगी भैरवीला (सात वर्ष) घेऊन तिथे गेले. तिथेच मुलीला गळफास देऊन त्यांनी स्वत: गळफास घेतला. बराच वेळ होऊनही ते घरी न परतल्याने कुटुंबियांनी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे कुटुंबिय योगमाला इमारतीत गेले. दरवाजा वाजवूनही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर आसपासच्या नागरिकांच्या मदतीने दरवाजा तोडल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड झाला. या घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलिसांनी धाव घेतली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.