नाशिक : पोलिसांची मदत मिळण्यासाठी असलेल्या ११२ क्रमांकावर संपर्क साधण्यात आल्याने रात्री सातपूर परिसरात अवघ्या तासाभरात गाडीच्या काचा फोडणाऱ्या तीन टवाळखोरांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.
मध्यरात्रीनंतर सातपूरच्या शिवाजी नगरातील निगळ पार्क भागात घरासमोर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा काही समाजकंटकांकडून फोडण्यात आल्या. काही जणांनी परिसरातील घरांवर दगडफेकही केली. हातात कोयते घेत आरडाओरड करत परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना बोलविले तरी ते आमचे काही करु शकत नाहीत, असे थेट आव्हानच त्यांनी दिले. या प्रकाराची माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांशी संवाद साधला.
नागरिकांनी ११२ क्रमांकावर गंगापूर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच गंगापूर पोलिसांचे फिरते पथक, सीआर मोबाईल, पीटर मोबाईल या पोलिसांच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिसांनी इमारतीच्या गच्चीवर जाऊन तीन जणांना ताब्यात घेतले. तिघेही विधीसंघर्षित असून त्यांच्याविरुध्द गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालकांचे दुर्लक्ष
सातपूर परिसरातील गाड्यांची तोडफोड प्रकरणात तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. ही मुले अवघ्या १६ -१७ वर्षाची आहेत. रात्री बारानंतर मुले घराबाहेर पडली. पालकांचे आपल्या पाल्यांकडे संपूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. या मुलांनी केवळ दहशत माजवण्यासाठी गाड्यांची तोडफोड, घरावर दगडफेक केली आहे. गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील एकाची मनमाड येथील सुधारगृहात तर दोघांची नाशिक येथील बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. – जगवेंद्रसिंग राजपूत ( निरीक्षक, गंगापूररोड पोलीस ठाणे)
अल्पवयीन बालकांचा गुन्ह्यातील सहभाग
मागील काही वर्षात अल्पवयीन बालकांचा गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभाग वाढत आहे. हत्या, मारामारी, परिसरात दहशत माजवणे ,लुटमार यासारख्या गंभीर प्रकारात अल्पवयीन बालकांचा सहभाग वाढत असून पोलिसांसह पालकांसमोर त्यामुळे आव्हान उभे राहिले आहे.