नाशिक – विद्यार्थी सुरक्षेसाठी शहरातील सर्व शाळेतील कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी करण्यात येणार आहे. शाळा समन्वयासाठी पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक केली जाईल, असे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी म्हटले आहे. महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने शहरातील सर्व शाळांचे प्रमुख, मुख्याध्यापक, प्राचार्य यांची बैठक महाकवी कालिदास कला मंदिर येथे नुकतीच पार पडली. शालेय शिक्षणाशी संबंधित प्रशासकीय, शैक्षणिक, सुरक्षा आणि सामाजिक उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीवर बैठकीत मंथन करण्यात आले. शिक्षण मंडळाच्या प्रशासनधिकारी डॉ. मिता चौधरी यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळांनी तातडीने प्रभावी उपाय योजना करण्याची आवश्यकता मांडली. पॅट चाचणी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) कामकाज, शिक्षक रजा प्रक्रिया यावर माहिती चर्चा झाली. स्लेपिंग बी, शिष्यवृत्ती परीक्षा, विज्ञान प्रदर्शन, संयुक्त शाळा अनुदान यावर माहिती देऊन चौधरी यांनी निपूण महाराष्ट्र अहवाल सादरीकरणावर भर दिला.

शहरात ॲटोरिक्षा व अन्य वाहनांतून शालेय विद्यार्थ्यांची धोकादायकपणे वाहतूक होत असल्याचे दृष्टीपथास पडते. या वाहनात क्षमतेहून अधिक विद्यार्थी बसविले जातात. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज दौंड यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीविषयी मार्गदर्शन केले. शाळा वाहतूक समित्यांचे कार्य, जबाबदाऱ्या व नियमावलीची जाणीव करून दिली. शालेय वाहनांवरील वाहनचालकांची पार्श्वभूमी तपासणे गरजेचे आहे. पालक-शाळा समन्वयाचे महत्व त्यांनी अधोरेखीत केले. जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी झोले यांनी शाळांमध्ये सीसी टीव्ही व सूचना फलक, प्रवेशद्वार नोंदणी पुस्तक, सखी सावित्री समिती स्थापनेविषयी मार्गदर्शन केले. सीसी टीव्हीद्वारे शाळा परिसरात लक्ष ठेवता येते. संभाव्य गैरप्रकाराला प्रतिबंध करता येतो. शाळा व्यवस्थापनाने सीसी टीव्ही कार्यान्वित ठेवणे आवश्यक आहे. शाळेत विविध कारणांस्तव येणाऱ्या व्यक्तींची सविस्तर नोंद आवश्यक आहे. त्यासाठी प्रवेशद्वारावर पुस्तिका ठेवण्याची सूचना करण्यात आली. शिक्षणाधिकारी योजना जगताप या्ंनी नवभारत साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन आदींवर माहिती दिली.

पोलिसांकडून विविध उपाययोजना

शाळा व्यवस्थापनाला विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शहर पोलिसांकडून सहकार्य केले जाईल. शाळांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांची पोलिसांमार्फत पडताळणी केली जाईल. शाळांशी समन्वय राखण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल. विद्यार्थी सुरक्षेशी संबंधित विविध उपाययोजनांची अमलबजावणी करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले. विद्यार्थी व शिक्षक वृंदाला पोलीस आयुक्तांशी व्हॉट्स ॲप क्रमांक तसेच आपत्कालीन वापरासाठी ११२ क्रमांकावर संपर्क साधता येईल. विद्यार्थ्यांनी कुंभमेळा स्वयंसेवक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.