नाशिक : जिल्ह्यात आदिवासीबहुल परिसरासह अन्य ठिकाणी कुपोषणाचे असणारे प्रमाण पाहता कुपोषण मुक्तीसाठी ”पोषणदूत ” या योजनेची आरोग्य विभागाच्या वतीने प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. सामूहिक प्रयत्नातून जिल्ह्यातील ९७ बालके ”नॉर्मल” (साधारण) श्रेणीत आले आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांची संकल्पना आणि मार्गदर्शनानुसार कुपोषण कमी करण्याच्या उद्देशाने १५ ऑगस्टपासून “पोषणदूत” ही योजना सुरु करण्यात आली. या योजनेंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावरील वर्ग एक आणि वर्ग दोन अधिकारी ”पोषणदूत” बनून अतितीव्र कुपोषित बालकांना दत्तक घेऊन, बालकांच्या पोषण आणि आरोग्य सुधारण्यासाठी तसेच त्यांना ”नॉर्मल” श्रेणीत आणण्यासाठी प्रयत्नरत आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी नुकतीच आरोग्य विभाग आणि महिला व बाल कल्याण विभागातील तालुका आरोग्य अधिकारी आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची समन्वय आढावा बैठक घेतली. योजनेत प्रत्येक अधिकाऱ्याने एका बालकास दत्तक घेऊन त्याचे आरोग्य, पोषण आणि स्वच्छतेच्या प्रश्नांचा सक्रिय पाठपुरावा करण्यात येत आहे. प्रमाणित कार्यप्रणालीनुसार दरमहा अतितीव्र कुपोषित बालकांचा पाठपुरावा करण्यात येत आहे, यासाठी बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना तालुकास्तरीय प्रमुख अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण ३४५ अतितीव्र कुपोषित बालकांपैकी ९७ साधारण श्रेणीत आणि १३६ बालके मध्यम कुपोषित श्रेणीमध्ये परावर्तित झाली आहेत. उर्वरित ११२ अतितीव्र कुपोषित बालकांकडे विशेष लक्ष देण्याचे आदेशित करण्यात आले आहे.
दरम्यान कुपोषण नियंत्रणासाठी बालकांची नियमित तपासणी, आवश्यक औषधोपचार आणि संदर्भ सेवा त्वरित उपलब्ध करून देणे. बालक योग्य प्रकारे खात नसेल तर पालकांना मार्गदर्शन करणे. , दत्तक बालकांच्या पालकांना नियमित भेटणे आणि दूरध्वनीद्वारे संभाषण साधून बालकांची सद्यस्थिती जाणून घेणे. कुपोषित बालकांना वजन वाढीसाठी त्यांच्या पालकांना बालकांना केंद्रात दाखल करण्यासाठी प्रवृत्त करणे. आहार नियमितपणे मिळण्यासाठी मुख्य सेविकांमार्फत पाठपुरावा करणे. सर्व अतितीव्र कुपोषित बालकांची हिमोग्लोबिन तपासणी, आदी सुचना करण्यात आल्या आहेत.
या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रताप पाटील, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल नेहेते, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक लोणे, डॉ. युवराज देवरे, हे जिल्हास्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक उपस्थित होते.
