जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत लक्ष्मीपूजनासह पाडवा आणि भाऊबीजेला सोने, चांदीच्या दरात मोठी उलाथापालथ झाली. दिवाळीची धामधूम आटोपल्यावर शुक्रवारी सकाळी दोन्ही धातुंच्या दरात आणखी पडझड झाल्याचे पाहायला मिळाले. दिवाळीसारख्या मोठ्या सणानंतर भारतात सोने आणि चांदीची खरेदी मंदावली असून, यामुळे या मौल्यवान धातूंवरील मागणीत लक्षणीय घट दिसून येत आहे.
सामान्यतः सोने आणि चांदीला सुरक्षित गुंतवणुकीचे आश्रयस्थान मानले जाते, म्हणजेच आर्थिक किंवा राजकीय अनिश्चिततेच्या काळात लोक या धातूंमध्ये गुंतवणूक करतात. मात्र, पुढील आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची नियोजित बैठक होणार असल्याने, जागतिक व्यापार युद्धाबाबतची चिंता काहीशी कमी झाली आहे. या सकारात्मक भावनेमुळे गुंतवणूकदारांनी अलीकडच्या तेजीनंतर नफा बुकिंग सुरू केली आहे. एकूणच सणानंतरच्या मागणीत घट, नफा बुकिंग आणि जागतिक व्यापार चर्चांबाबतचा सकारात्मक वातावरण, या सर्व घटकांमुळे सोने-चांदीच्या बाजारात सध्या किंचित मंदीचे वातावरण दिसून येत आहे.
शहरात १७ ऑक्टोबरला २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम जीएसटीसह एक लाख ३५ हजार ४४५ रूपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले होते. परंतु, धनत्रयोदशीला तब्बल २७८१ रुपयांची घट झाल्याने सोन्याचे दर एक लाख ३२ हजार ३५५ रुपयांपर्यंत खाली आले होते. तर लक्ष्मीपूजनाआधी सोमवारी दिवसभरात १०३ रुपयांची किंचित वाढ झाल्याने सोन्याचे दर एक लाख ३२ हजार २५२ रुपयांवर स्थिरावले होते. मंगळवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मात्र ६२० रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने सोने एक लाख ३२ हजार ८७० रुपयांवर पोहोचले. तर बुधवारी बालिप्रतिपदेला सोने एक लाख २६ हजार ६९० रूपयांपर्यंत खाली आले. तसेच भाऊबीजेला पुन्हा १०३० रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर एक लाख २७ हजार ७२० रूपयांपर्यंत वधारले. अर्थात, दिवाळीची धामधूम आटोपल्यानंतर शुक्रवारी सकाळी पुन्हा १०३० रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे २४ कॅरेट सोने जीएसटीसह एक लाख २६ हजार ६९० रूपयांपर्यंत खाली आले. अशा प्रकारे सोन्यात आठवडाभरात तब्बल ८७५५ रूपयांनी घट झाली.
चांदीच्या दरातही घसरगुंडी
जळगावमध्ये १५ ऑक्टोबरला चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख ९२ हजार ६१० रूपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले होते. मात्र, नंतरच्या मोठी घट झाल्याने लक्ष्मीपूजनापर्यंत चांदीचे दर एक लाख ६९ हजार ९५० रूपयांपर्यंत खाली आले. घसरण सुरू राहिल्याने बालिप्रतिपदेला चांदी एक लाख ५९ हजार ६५० रूपयांपर्यंत खाली आली. भाऊबीजेच्या दिवशी मात्र कोणतीच वाढ अथवा घट नोंदवली गेली नाही. त्यामुळे चांदीचे दर स्थिर राहिले. शुक्रवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा ५१५० रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदी एक लाख ५४ हजार ५०० रूपयांपर्यंत घसरली. आठवडाभरात ३८ हजार ११० रूपयांनी घट झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला.
