जळगाव : बहुचर्चित हनी ट्रॅप प्रकरणाचे धागेदोरे आता थेट जळगाव जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणी जामनेर तालुक्यातील संशयित प्रफुल्ल लोढा याच्या विरोधात मुंबईत पोस्को कायद्यांतर्गत बलात्कार आणि हनी ट्रॅपसंबंधी दोन गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. अटक केल्यानंतर त्याच्या जळगाव जिल्ह्यातील संपत्तीची झाडाझडती घेण्यात आली आहे. पोलिसांनी झडतीत लॅपटॉप, पेन ड्राइव्ह, भ्रमणध्वनी जप्त केले असून, आणखी काही महत्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून प्रफुल्ल लोढा याने जळगावमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि लगेच माघारही घेतली होती. त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या लोढा याचे बहुचर्चित हनी ट्रॅप प्रकरणातील कारनामे आता उघडकीस आले आहेत. मुंबईतील चकाला परिसरात चकाला हाऊस नावाने त्याचा अलिशान बंगला आहे. याशिवाय, जामनेर तालुक्यातील पहूर येथे व्यापारी संकूल आहे. अटकेनंतर खोलात जाऊन तपास करत असताना, मुंबई पोलिसांनी जिल्ह्यातील जामनेर, पहूर आणि जळगाव शहरात काही ठिकाणी छापे टाकले.
या छाप्यांदरम्यान पोलिसांनी लोढा याच्या मालकीच्या आणि त्याने भाड्याने दिलेल्या गाळ्यांची चौकशी करण्यात आली. काही कागदपत्रेही तपासली गेली. याव्यतिरिक्त लोढा याच्या ताब्यातील लॅपटॉप, पेन ड्राइव्ह, भ्रमणध्वनीसह अनेक महत्त्वाची इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. त्यातून पोलिसांना हनी ट्रॅप प्रकरणाशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हनी ट्रॅपमध्ये सध्या देशभरातील सुमारे ७२ अधिकारी आणि राजकीय नेते अडकल्याची शक्यता असल्याने हे प्रकरण पोलिसांकडून अतिशय काळजीपूर्वक हाताळले जात आहे.
जामनेर तालुक्यातील पहूर येथील मूळ रहिवासी असलेल्या ६२ वर्षीय प्रफुल्ल लोढा याच्यावर अल्पवयीन मुलींना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तसेच त्यांचे छायाचित्र काढून ते प्रसारित केल्याचे गंभीर आरोप आहेत. तेवढ्यावरच न थांबता पीडित मुलींना जबरदस्तीने डांबून ठेवण्याचाही आरोप त्याच्यावर पोलिसांकडून करण्यात आला आहे.
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील साकीनाका आणि अंधेरीच्या औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात प्रफुल्ल लोढा याच्याविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत बलात्कार, खंडणी आणि हनी ट्रॅपसंबंधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलिसांनी तत्काळ कारवाई करत लोढा याला अटक केली आहे. या प्रकरणामुळे हनी ट्रॅपचे जाळे हे जळगावपर्यंत पसरल्याचे स्पष्ट झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.