नाशिक – बालगोपाळांबरोबर नागरिकांनाही भ्रमंती करता यावी यासाठी महानगरपालिकेची शहरात जवळपास ५५० उद्याने, जॉगिंग ट्रॅक आहेत. यातील काही उद्याने विकसित तर, काही अविकसित आहेत. काही प्रमुख उद्यानात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले गेले आहेत. उद्यानांच्या नगरीत एका अनोख्या उद्यानाचा समावेश होणार आहे. गुरुवारपासून हे उद्यान नाशिककरांसाठी खुले होत आहे. या ठिकाणी बालगोपाळांना छोटा भीम, छुटकी, जग्गू, कालिया, गोलू अशी बालविश्वातील आवडती मंडळी भेटणार आहेत.

गंगापूर रस्त्यावरील स्व. प्रमोद महाजन स्मृती उद्यानाचे नूतनीकरण नुकतेच पूर्ण झाले. या उद्यानाचे लोकार्पण गुरुवारी पहाटे पाच वाजता होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गायक सुरेश वाडकर, नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, सिंहस्थ कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग, तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित राहणार आहेत.

उद्यानाच्या लोकार्पणानंतर आयोजित “भाऊबीज पहाट” कार्यक्रमात सुरेश वाडकर यांचे सुरेल गीत-संवाद सादर होणार आहे. शहरातील सहा विभागात लहान-मोठी सुमारे ५५० उद्याने व जॉगिँग ट्रॅक असल्याचे उद्यान विभागाकडून सांगण्यात आले. यात पंचवटीत ११८, नाशिक पश्चिममध्ये ८५, सिडको ८६, नाशिक पूर्व ७५, नाशिकरोड १२५ आणि सातपूर विभागात ४८ हून उद्यानांचा समावेश आहे.

प्रमोद महाजन उद्यानाच्या नूतनीकरणासाठी मध्य नाशिक मतदारसंघाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. सुमारे ४५०० चौरस मीटर क्षेत्रफळावर पसरलेल्या या उद्यानात समृद्ध हिरवळ, नाविन्यपूर्ण खेळणी, सुबक रचना, फायबरच्या प्राण्यांच्या मूर्ती आणि अत्याधुनिक सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्था अशी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे हे उद्यान नाशिकच्या बाल गोपाळांसह पालकांसाठी एक नवे प्रेक्षणीय स्थळ ठरणार आहे. कारण, या उद्यानाच्या माध्यमातून “भीम की शक्ती, धूम मचाए, सामने कोई टिक ना पाए” या प्रसिद्ध ओळींनी बालविश्वात लोकप्रिय ठरलेल्या ‘छोटा भीम’ या कार्टून पात्राची रंगीत दुनिया आता नाशिककरांच्या भेटीस येणार आहे.

उद्यानाचे नुतनीकरण बालगोपाळांचा विचार करून करण्यात आले. त्या अंतर्गत उद्यानात छोटा भीम, छुटकी, जग्गू, कालिया, गोलू अशी आकर्षक पात्रे लहानग्यांना खेळण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी सज्ज झाली आहेत. शहरात विविध भागात उद्याने आहेत. लहानग्यांना खेळण्यासाठी तिथे अनेक खेळणी आणि नागरिकांना पायी भ्रमंतीसाठी ट्रॅकची व्यवस्था आहे. परंतु, उद्यानात कार्टून पात्रांची संकल्पना मांडण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जाते.

उद्यानाच्या लोकार्पणानंतर आयोजित “भाऊबीज पहाट” कार्यक्रमात सुरेश वाडकर यांचे सुरेल गीत-संवाद सादर होणार आहे. नागरिकांनी या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आ. प्रा. फरांदे यांनी केले आहे.