लोकसत्ता वार्ताहर

धुळे: प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील हे अध्यक्ष असलेल्या येथील जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीवर तपासणी पथकाने शनिवारी पहाटे छापा घातला. सूतगिरणी व्यवस्थापनासह काही भ्रमणध्वनींसह इतर संपर्क यंत्रणा खंडित करण्यात आली आहे. पथकाने हा परिसर पोलीस बंदोबस्तात ताब्यात घेतला.

केंद्र आणि राज्यात असलेल्या सत्तेचा गैरवापर करुन भाजपकडून ईडीसह इतर यंत्रणांचा धाक दाखवला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून कायमच करण्यात येतो. काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा म्हणून याआधी त्यांना गळाला लावण्याचेही प्रयत्न झाल्याचेही सांगण्यात येते. पाटील यांच्याकडे नऊ वर्षांपासून सूतगिरणीचे अध्यक्षपद आहे. धुळे तालुक्यातील मोराणे शिवारात ही सूतगिरणी आहे. शनिवारी पहाटे पोलीस कुमकसह धडकलेल्या ताफ्याने सूतगिरणीत खळबळ उडाली. हे पथक नेमक्या कोणत्या विभागाचे, याबद्दल गुप्तता बाळगण्यात आली आहे.

हेही वाचा… सावकारांच्या छळास कंटाळून शिक्षकाची आत्महत्या; धुळे जिल्ह्यातील घटना

पथकातील काही अधिकाऱ्यांनी सूतगिरणीच्या व्यवस्थापकांच्या निवासस्थानीही तपासणी केल्याचे म्हटले जात आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाटील यांच्याकडे नुकतीच विदर्भातील अमरावती नागपूर लोकसभा मतदार संघाची जबाबदारी सोपवली आहे. धुळे जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघातून काँग्रेसतर्फे निवडून आलेले कुणाल पाटील हे एकमेव आमदार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सूतगिरणीवर कोणत्या संस्थेने छापा टाकला, याची माहिती नाही. संपर्क यंत्रणा बंद करण्यात आली असून या संदर्भात आपणास या क्षणापर्यंत काहीही कल्पना नाही. गिरणीचे लेखापरीक्षण झाले असून त्यात कुठलाही दोष आढळून आलेला नाही. या छाप्यामागे राजकीय हेतू असेल असा दावा आपण ठोस काही कळल्याशिवाय करु शकत नाही. – आमदार कुणाल पाटील (कांग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष)