मनमाड – जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात ख्याती असलेल्या मनमाड -कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस गणेश मंडळाच्या धावत्या गाडीतील श्री गणेश उत्सव यंदाही थांबलेला आहे. अनेक वर्ष सातत्याने मागणी करूनही गोदावरी एक्स्प्रेस सुरू झाली नाही. त्यामुळे चाकरमान्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यामुळे श्री गणरायाला घडणारा मनमाड ते कुर्ला हा दररोज ३०० किलोमीटरचा प्रवास यावर्षीही गणेशोत्सवात खंडित होणार आहे.
गेल्या २७ वर्षापासून धावत्या गाडीमध्ये साजरा होणारा हा गणेशोत्सव नाशिक जिल्ह्यात नव्हे तर, राज्यात प्रसिद्धीच्या झोतात आला होता. मनमाड-कुर्ला गोदावरी एक्सप्रेस या गाडीमध्ये दरवर्षी नियमित प्रवास करणारे चाकरमाने व प्रवासी वर्ग यांनी गणेश मंडळाच्या माध्यमातून या उत्सवाचा श्री गणेश केला. गोदावरी एक्स्प्रेसच्या हंगामी तिकिट अर्थात मासिक पास बोगीत आकर्षक सजावट करून श्री गणरायाच्या मूर्तीची स्थापना दरवर्षी केली जात होती.
मनमाडहून गाडी सुटल्यानंतर आणि परतीच्या प्रवासात नाशिक येथून गाडी सुटल्यानंतर दररोज गाडीमध्ये श्रींची आरती होऊन सर्व प्रवाशांना प्रसाद वितरण केले जात होते. या निमित्त मासिक पासबोगीची आकर्षक सजावट करून सुशोभित करण्यात येत होती. पण करोना काळात गोदावरी एक्स्प्रेस बंद झाली. त्यानंतर रेल्वेने स्वतंत्र बोगी उपलब्ध करून दिली. त्या बोगीमध्ये या गणेशाची स्थापना होऊ लागली. गोदावरी एक्स्प्रेस पूर्ववत सुरू करावी, अशी वारंवार मागणी करूनही ही गाडी अद्यापपर्यंत सुरू झालेली नाही. याच गाडीच्या वेळेत उन्हाळी विशेष पर्यायी मनमाड-मुंबई गाडी सुरू करण्यात आली होती.
त्यानंतर सध्या गोदावरी एक्स्प्रेस ऐवजी धुळे -मुंबई ही पर्यायी गाडी या वेळेत धावते. पण या गाडीमध्ये गणेशोत्सवात श्रींची स्थापना करणे आणि गणेशोत्सव साजरा करणे शक्य नाही. शिवाय विद्यमान खा. भास्कर भगरे यांना वर्षभरात हा प्रश्न सोडविण्यात यश आलेले नाही.
गोदावरीच्या राजाचा प्रवास सलग दुसऱ्या वर्षी थांबला आहे. कारण, गोदावरी एक्स्प्रेस अजून सुरू झालेली नाही. रेल्वेच्या असहकाराच्या धोरणामुळे उत्सव करू शकत नाही. रेल्वे प्रशासनाकडे प्रवासी संघटनेने सातत्याने पाठपुरावा करूनही रेल्वे प्रशासन गोदावरी एक्स्प्रेस का सुरू करू शकत नाही, याचे ठोस कारण न देता करोना काळापासून ही गाडी रोखून धरली आहे. प्रवासी संघटनेने वेळोवेळी सर्व स्तरावर पाठपुरावा केला. त्यामुळे रेल्वेचे आडमुठे धोरण व असहकारामुळे गोदावरीच्या राजाचा प्रवास थांबला. – नरेंद्र खैरे (मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते व रेल्वे प्रवासी संघटना सदस्य)