नंदुरबार – मतदार याद्यांमधील घोळावरुन मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाविषयी काहीही विचारु नका, याबाबत त्या दोघांनाच विचारा, असे स्पष्ट करीत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे वादापासून सोईस्कररित्या स्वत:ला दूर ठेवले.रक्षा खडसे यांना भाजपकडून नंदुरबार जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील चारही नगर परिषदांसाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती त्यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात येत आहेत. नंदुरबार शहरात भाजकडून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असून स्थानिक स्तरावर देखील भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना पाठबळ असल्याने नगर परिषदांसाठी इच्छुकांचा मोठा कल भाजपकडे असल्याने एकेका जागेसाठी पाच ते सहा जण निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे मंत्री रक्षा खडसे यांनी सांगितले.
मुळातच भाजप राज्यातील सर्वच नगर परिषद आणि ऩगर पंचायतीमध्ये निवडून येईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महायुतीबाबत स्थानिक स्तरावरच निर्णय घेण्याचे आदेश प्रदेश स्तरावरुनच देण्यात आले असून नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांशी चर्चा करुन युतीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली जाईल, असे मंत्री रक्षा खडसे म्हणाल्या.
मतदार यांद्यामधील घोळावरुन जळगावमध्ये मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरु आहे. एकाने आरोप केले की, दुसरा प्रत्यारोप करतो. खडसे आणि महाजन दोघांमध्ये कोणीही थांबण्यास तयार नाही. खडसेंनी मतदार याद्यांमधल्या घोळाबाबत केलेल्या आरोपांना उत्तर देताना मंत्री गिरीश महाजन यांनी सून रक्षा जिंकली तेव्हा मतदार यांद्यामध्ये घोळ नव्हता का.
मुलगी पडली आणि मतदार यांद्यामध्ये घोळ कसा झाला, असा प्रश्न उपस्थित केला होता. याबाबत पत्रकारांनी रक्षा खडसे यांना विचारणा केली असता गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्या कुठल्याही वादाबाबत मला काहीही विचारु नका. त्याच दोघांना विचारा, असे म्हणत त्यांनी या वादातून सोईस्कररित्या अंग काढण्याचा प्रयत्न केला. एकीकडे सासरे तर दुसरीकडे ज्या पक्षाच्या मंत्री त्याच पक्षाचे वरिष्ठ मंत्री, त्यामुळे या वादावर न बोलणे मंत्री रक्षा खडसे यांनी पसंद केले.
लोकसभा निवडणुकांवेळी भाजपचे उमेदवार मोठ्या प्रमाणात पराभूत झाले. त्यावेळी विरोधकांना मतदार यांद्यांमधील घोळ का दिसला नाही. विधानसभा निवडणूकीत भाजप विजय़ी होताच मतदार यांद्यांमध्ये घोळ कसा, असा प्रश्न देखील रक्षा खडसे यांनी उपस्थित केला.
विशेष म्हणजे यावेळी पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याबाबत त्यांना पत्रकारांनी विचारणा केली असता याबाबत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याचे सांगत याबाबतही त्यांनी बोलणे टाळले. यावेळी त्यांच्या समवेत मुलाखत घेणाऱ्यांमध्ये आमदार डॉ. विजयकुमार गावित, प्रदेश महामंत्री विजय चौधरी , माजी खासदार डॉ हिना गावित उपस्थित होते. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील खेडदिगर हे रक्षा खडसेंचे माहेर असल्याने त्यांचा जिल्ह्यातील राजकारणात अधिक ओढा मानला जातो.
