मालेगाव : विविध शाळांमधील शालेय पोषण आहारासाठी शासनाने दिलेला तांदूळ काळ्या बाजारात विक्री करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात योगिता हिरे यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. योगिता या माजी आमदार अपूर्व हिरे यांच्या पत्नी आहेत.
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या मालेगाव महापालिका हद्दीतील ११ शाळांचा शालेय पोषण आहार शिजविण्याचा ठेका योगिता हिरे अध्यक्ष असलेल्या संस्थेस देण्यात आला आहे. या संस्थेकडून दाभाडी शिवारात असलेल्या मध्यवर्ती स्वयंपाकगृहात (सेंट्रल किचन) अन्न शिजवून ते संबंधित शाळांना पाठविले जाते. आठ दिवसांपूर्वी या ठिकाणी असलेल्या गोदाम आणि स्वयंकपाकघरातून रात्रीच्या सुमारास तांदळाच्या गोण्या एका मालमोटारीतून काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती छावणी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित मालमोटार रंगेहात पकडली. मालमोटारीसह तांदळाच्या २२७ गोण्या या कारवाईत जप्त करण्यात आल्या.
पकडण्यात आलेल्या मालमोटारीतील तांदूळ हा शासनाने शालेय पोषण आहारासाठी दिलेल्या साठ्यातील असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी चालक अमोल अहिरे, योगिता हिरे, अर्चना शिंदे, ज्योती सोनवणे, सोनल मंडलेचा, उर्मिला खांडे, विद्या लगड, नीलिमा थेटे, सुरेखा बच्छाव, सोनल निकुंभ, पल्लवी पाटील, श्रद्धा जोगळेकर, स्मिता देशमाने, ज्योती शिंदे अशा १४ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा – कचरा जाळण्यास विरोधामुळे टोळक्याची मारहाण, विनयभंग
या प्रकरणी योगिता हिरे यांनी येथील अप्पर व जिल्हा सत्र न्यायमूर्ती एस. यू. बघेले यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी घेत न्यायमूर्तींनी हा अर्ज फेटाळला आहे. गेल्या काही दिवसांत अपूर्व हिरे यांच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. अपूर्व यांचे बंधू आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे हे १५ नोव्हेंबरपासून जिल्हा बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात तुरुंगात आहेत. आता योगिता यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला गेल्याने हिरे कुटुंबियांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.