नाशिक – शहरातील जेलरोड परिसरातील रहिवासी निवृत्त मुख्याध्यापकाने आजारी पत्नीची गळा दाबून हत्या करत स्वत: गळफास घेतला. मुख्याध्यापकाने हे कृत्य करण्यापूर्वी लिहिलेल्या चिट्ठीमुळे या प्रकरणाचा उलगडा झाला असून नैराश्यातून हा प्रकार झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले.जेलरोड येथील सावरकर नगरातील एकदंत अपार्टमेंटमधील पहिल्या मजल्यावर निवृत्त मुख्याध्यापक मुरलीधर जोशी (७८) हे पत्नी निवृत्त शिक्षिका लता जोशी (७६) यांच्याबरोबर राहत होते. त्यांचे दोन्ही मुलगे मुंबई येथे उच्चपदस्थ अधिकारी आहेत. लता या काही वर्षांपासून मेंदूविकाराने त्रस्त होत्या. त्यातून त्या सावरल्या होत्या. परंतु, अधूनमधून त्यांची तब्येत बिघडतच होती.

सततच्या आजाराला जोशी दाम्पत्य कंटाळले होते. बुधवारी सायंकाळी मुरलीधर यांनी लता यांची गळा दाबून हत्या केली. नंतर स्वत: गळफास घेतला. त्यांची मोलकरीण नेहमीच्या कामासाठी आली असता आवाज दिल्यावरही दरवाजा न उघडल्याने तिने आजूबाजूच्या रहिवाशांना त्याबद्दल सांगितले. नंतर उपनगर पोलिसांना कळविण्यात आले. पोलीस घटनास्थळी आल्यावर लता या मृतावस्थेत तर, मुरलीधर हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. पोलिसांना घरात मुरलीधर यांनी लिहिलेली चिट्ठी मिळाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्या चिठ्ठीत पत्नी लता यांच्या आजारपणाचा उल्लेख करुन तिच्या वेदना पाहणे असह्य होत असल्याने तिची हत्या करत असून तिच्यावर माझे प्रेम आत्यंतिक प्रेम असल्याने मीपण आत्महत्या करत आहे, असा उल्लेख आढळला. या प्रकरणी मुरलीधर जोशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूवारी जोशी दाम्पत्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.