धुळे : सुमारे सहा एकर जमीन बनावट गावठाण प्रमाणपत्राच्या आधारे हडप करण्याचा प्रयत्न झाल्याने या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली होती. परंतु, चौकशी अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली करण्यात आल्याने संतप्त नागरिकांनी बदली रद्द न झाल्यास १५ ऑगष्ट रोजी धुळे जिल्ह्यात सुरत – नागपूर महामार्गावरील नेर-लोणखेडी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. नेर ग्रामपंचायतीचे सदस्य डॉ.लक्ष्मीकांत बोढरे यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिकांच्या शिष्टमंडळाने धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन दिले.

विधिमंडळ अंदाज समिती सदस्य सदाभाऊ खोत यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर धुळे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बाजीराव जगताप यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. जगताप यांनी चौकशीला सुरुवात करताच पाच ऑगष्ट रोजी सायंकाळी त्यांची बदली झाल्याचे आदेश प्राप्त झाले. यामुळे या प्रकरणात काही राजकीय पुढाऱ्यांचाही सहभाग असल्याचा संशय बळावल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढून नागरिकांनी बदलीवर आक्षेप घेतला आहे.

२५ जुलै रोजी विस्तार अधिकारी बाजीराव जगताप यांनी शिरथाणे (नेर) येथील स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालयासाठी मिळालेल्या ५५ लाख रुपयांच्या अनुदानात झालेल्या अपहाराची निःपक्षपातीपणे चौकशी केली. या प्रकरणी फौजदारी लोकायुक्तांच्या आदेशान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय लामकानी (ता.धुळे) येथील स्वच्छ भारत मिशन योजनेच्या अपहार प्रकरणात दोषी सरपंच, ग्रामसेवकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १५ दिवसापूर्वीच दिले. नेर (ता.धुळे) ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच, ग्रामसेवकांकडून सुमारे ७५ लाख रुपये वसुलीसह १४ व्या वित्त आयोगाच्या कोट्यवधी रुपयांच्या अपहार तक्रारींची चौकशीही प्रलंबित आहे.

कोणतेही ठोस कारण नसताना केवळ राजकीय दबावामुळे बाजीराव जगताप यांची बदली करण्यात आली असून हे बदली आदेश रद्द करावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. जगताप यांची बदली रद्द न केल्यास १५ ऑगष्ट रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. यावेळी उद्भवणाऱ्या परिस्थितीला जिल्हा परिषद प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा निवेदनात देण्यात आला. निवेदनावर नेरच्या सरपंच गायत्री जयस्वाल, सदस्य डॉ. लक्ष्मीकांत बोढरे यांच्यासह अन्य नागरिकांची स्वाक्षरी आहे.