नाशिक – यंदाच्या रणजी हंगामात एलिट बी गटात दोन सामन्यांमधून नऊ गुण मिळवून प्रथम क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आणि दोन सामन्यांतून चार गुण मिळविणारा सौराष्ट्र या संघांमध्ये १ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत येथे चार दिवसीय रणजी क्रिकेट सामना होणार आहे. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान सामन्यासाठी सज्ज असले तरी शहरासह जिल्ह्यात अधूनमधून होत असलेल्या पावसाचे सावट या सामन्यावर आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी सकाळी रिमझिम सुरु झाल्याने सामन्याला सुरुवात झाली नाही. दुपारी एक वाजता मैदानाची स्थिती पाहून सामना सुरु करण्याविषयी निरीक्षक निर्णय घेणार आहेत.

मागील वर्षी २०२४-२५ च्या हंगामात नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात महाराष्ट्र रणजी क्रिकेट संघाला मिळालेल्या निर्विवाद विजयामुळे आणि नाशिकमधील क्रीडा रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे खुश झालेल्या महाराष्ट्र संघाने यावर्षी देखील नाशिक येथे रणजी सामना खेळण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळेच नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या उत्कृष्ट आयोजनामुळे यंदा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने रणजी सामना नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनला आयोजित करण्याची संधी दिली आहे.

या रणजी सामन्यानिमित्ताने जलदगती जयदेव उनाडकट, आक्रमक फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि महाराष्ट्र संघात या रणजी हंगामात मुंबई सोडून सामील झालेला पृथ्वी शॉ यासारख्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचा तसेच काही तारांकित आयपीएल खेळाडूंचा खेळ बघण्याची संधी नाशिककरांना मिळेल. २०२५-२६ हंगामातील दोन सामन्यात महाराष्ट्राने केरळविरुद्ध पहिल्या डावातील आघाडीचे तर चंदीगडविरुध्द विजय मिळवून पूर्णपणे गुण वसूल केले. त्यामुळे गटात महाराष्ट्र दोन सामन्यात नऊ गुणांसह आघाडीवर आहे. सौराष्ट्रने कर्नाटकविरुद्ध पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळवले आहेत. नाशिकमधील या रणजी सामन्यात क्रिकेट रसिकांना जोरदार व रंगतदार खेळाची अपेक्षा आहे. मागील हंगामातील सामन्यातदेखील ऋतुराज गायकवाड, कृणाल पंड्या या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी नाशिककरांना मिळाली. मुर्तुझा ट्रंकवाला ,सत्यजित बच्छाव व रामकृष्ण घोष हे तीन नाशिककर क्रिकेटपटू १६ जणांच्या मागील हंगामातील महाराष्ट्र क्रिकेट चमूत समाविष्ट होते. महाराष्ट्राच्या चंदीगडवरील विजयात सामनावीर ऋतुराज गायकवाड, पृथ्वी शाॅ, रामकृष्ण घोष, मुकेश चौधरी यांची कामगिरी मोलाची ठरली होती. चांगल्या लयीत असलेल्या ऋतुराज गायकवाडला सौराष्ट्रविरुध्दच्या सामन्यात पावसाचे विघ्न यावयास नको, असे निश्चित वाटत असेल. अर्शिन कुलकर्णी, जलज सक्सेना यांच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असेल.

या सामन्यात महाराष्ट्राचे नेतृत्व अंकित बावणे तर, सौराष्ट्रचे नेतृत्व जयदेव उनाडकट करीत आहेत. प्रेक्षकांसाठी खास गॅलरी उभारण्यात आली असून सर्वांना मुक्त प्रवेश आहे. प्रेक्षकांनी खेळाडूंना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेत खेळाचा आनंद घ्यावा, असे आवाहन नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेकडून करण्यात आले आहे.