जळगाव : जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या (शरद पवार) काही दिग्गजांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर शरद पवार आणि अजित पवारांचे खंदे समर्थक मानले जाणारे अमळनेरचे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी तटस्थ भूमिका घेतली होती. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागल्यावर आता त्यांनी पुन्हा एकच वादा अजितदादाचा नारा दिला आहे.

विधानसभेच्या निवडणुकीतील दारूण पराभवानंतर जिल्ह्यातील माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, माजी आमदार कैलास पाटील, दिलीप सोनवणे यांच्यासह बऱ्याच तोलामोलाच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिली होती. आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता.

त्या वेळी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील काय भूमिका घेतात, त्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. परंतु, पाटील तटस्थ भूमिका घेत सर्वांना कोड्यात टाकले होते. अर्थात, मे महिन्यात अमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या लोकार्पण प्रसंगी महायुतीच्या मंत्र्यांसोबत उपस्थित राहून त्यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि अमळनेर तालुका शहर विकास आघाडीचा बूथ मेळावा पार पडला. त्या ठिकाणी अजित पवार गटाचे नेते आमदार अनिल पाटील यांच्यासह माजी आमदार पाटील यांनीही हजेरी लावली. बऱ्याच दिवसानंतर ते एखाद्या राजकीय व्यासपीठावर दिसून आले. विशेष म्हणजे त्यांच्या गळ्यात अजित पवार गटाचा रूमाल होता. साहजिक मेळाव्यास उपस्थित सर्वांच्या भुवया उंचावल्या. कारण, जिल्ह्यातील शरद पवार गटाच्या दोन माजी मंत्र्यांसह दोन माजी आमदार आणि इतर पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यावर माजी आमदार पाटील यांनी सर्वांना कोड्यात टाकले होते. तेव्हा काका किंवा पुतण्याच्या बाजुने न जाता तटस्थ राहणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले होते.

कृषिभूषण साहेबराव पाटील २००९ मध्ये अमळनेरमधून पहिल्यांदा अपक्ष निवडणूक लढवून विधानसभेत पोहोचले होते. अर्थात, अपक्ष निवडून आल्यावर त्यांनी त्यावेळी तत्कालिन महाविकास आघाडी सरकारला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार तसेच अजित पवार यांच्याशी निर्माण झालेल्या घनिष्ठ संबंधाचा फायदा घेऊन नंतरच्या काळात त्यांनी तापीवरील पाडळसरे प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादीने अधिकृत उमेदवारी दिली. परंतु, दुसऱ्यांदा निवडणूक लढल्यावर पाटील यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी स्वतः कधी विधानसभेची निवडणूक लढली नाही. कालांतराने त्यांच्या सौभाग्यवती पुष्पलता पाटील या अमळनेरच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष बनल्या.

मी कुठेच गेलेलो नाही. एकच वादा अजितदादा करून पाच वर्षे राष्ट्रवादीत राहिलो, अजुनही राष्ट्रवादीतच आहे. अमळनेरमधील बूथ मेळावा हा शहर विकास आघाडी आणि राष्ट्रवादीचा संयुक्त उपक्रम होता. – साहेबराव पाटील (माजी आमदार, अमळनेर)