नाशिक : शहरातील वाढती गुन्हेगारी, अमली पदार्थांची विक्री आदी प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी मागील महिन्यात शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर संयुक्त मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन आणि नाशिक पोलिसांवर आगपाखड केली होती. परंतु, अवघ्या काही दिवसांतील पोलिसांच्या धडक कारवाईने खासदार राऊत यांचे मत पूर्णत: बदलले आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने १२ सप्टेंबरला शहरात पहिल्यांदा संयुक्त मोर्चा काढला होता. तेव्हा खा. संजय राऊत यांनी नाशिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आंदोलन करणारे आमचे कार्यकर्ते पोलिसांना बरोबर मिळतात, परंतु, भाजपचा माजी नगरसेवक मिळत नाही. भाजप नगरसेवक हत्या करून फरार होतो. फरार असताना तो मंत्री गिरीश महाजन यांना बंगल्यावर भेटतो. त्याला कोण वाचवतेय, संशयित कुठल्या सरकारी बंगल्यात लपलाय. असे प्रश्न करीत त्यांंनी गृहमंत्र्यांनाही लक्ष्य केले होते.

दरम्यानच्या काळात हत्या व गोळीबार प्रकरणात पोलिसांनी अनुक्रमे भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे आणि जगदीश पाटील यांच्यावर कारवाई केली. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी पूर्णत: मोकळीक दिल्यानंतर नाशिक शहर पोलिसांनी धडक कारवाईला सुरूवात केली. मागील काही दिवसांत रिपाइंचे पदाधिकारी प्रकाश लोंढे, ठाकरे गटातून भाजपवासी झालेले मामा उर्फ बाबासाहेब राजवाडे, भाजप नेते सुनील बागूल यांचा पुतण्या अजय व गौरव बागूल यांना अटक झाली. टोळ्यांशी संबंधित वा टोळ्यांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या भाजपसह अन्य राजकीय पदाधिकाऱ्यांची चौकशी केली जात आहे.

गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वीकारलेल्या धोरणाचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्वागत करीत अभिनंदन केले. भाजपमधील नगरसेवकांनाही मुख्यमंत्र्यांनी सोडलेले नाही. अलीकडेच ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, अशा गुंडांच्या टोळ्यांचाही पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पूर्णत: बिमोड करण्याचे धोरण स्वीकारले आहे. गुन्हेगार हा भाजप, शिवसेना, काँग्रेस वा राष्ट्रवादी असा कुठल्याही पक्षाचा असो, जनतेला छळणारा, शहरात दरोडेखोरी करणाऱ्यांना दयामाया दाखवू नका, असे धोरण असेल तर, त्याचे स्वागत केले पाहिजे. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडून तशी कारवाई होत असल्याची प्रतिक्रिया खासदार राऊत यांनी प्रसारमाध्यमांना दिली.