लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री सप्तशंृगी निवासिनी देवी मंदिराच्या कळसावरील भागात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी दरड कोसळणे प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत सुरू असलेल्या कामामुळे महिनाभर बंद असणारे दर्शन शनिवारपासून सुरू होत आहे. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रारंभीचे काही दिवस मंदिर चोवीस तास खुले राहणार आहे.
सप्तशृंग गडावर डोंगराच्या कपारीत देवीचे मंदिर आहे. या परिसरात काही वर्षांपूर्वी दगड व दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यात काही भाविकांचाही मृत्यू झाला. या पाश्र्वभूमीवर अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आधिपत्याखाली प्रतिबंधात्मक उपायांवर काम सुरू झाले. ‘फ्लेक्झिबल बॅरिअर’ बसविण्याच्या कामामुळे २६ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर या जवळपास महिनाभराच्या कालावधीसाठी भाविकांना मुख्य मंदिरातील प्रवेश बंद ठेवण्यात आला. याबाबतची माहिती नसल्याने गडावर येणाऱ्या भाविकांची तारांबळ उडाली. न्यास व्यवस्थापनाने पर्यायी दर्शनाची व्यवस्था पहिल्या पायरीजवळ श्री भगवतीच्या प्रतिकात्मक मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेद्वारे केली होती. संरक्षक जाळी बसविण्याच्या कामाचा टप्पा नियोजनानुसार पूर्ण होत असल्याने शनिवारपासून देवीचे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे.
नाताळ सुटी व नूतन वर्षांच्या पाश्र्वभूमीवर, या काळात भाविकांची गडावर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. गुजरातमधून भाविकांच्या पालखी येतात. ही बाब लक्षात घेऊन भाविकांना सहजतेने दर्शन घेता यावे म्हणून देवस्थानने भाविक-भक्तांसाठी मंदिर २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबतची माहिती ट्रस्टचे मुख्य व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे यांनी दिली. १५ जानेवारी २०१६ पर्यंत भाविकांसाठी ही व्यवस्था राहील. त्यानंतर म्हणजे १६ जानेवारीपासून न्यासाच्या दैनंदिन नियोजनानुसार सकाळी ५.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे.