सारथी विभागीय कार्यालयाचा या भागातील उच्च शिक्षण, प्रशासकीय सेवा, परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ होईल. सरकार सारथीच्या पाठिशी ठामपणे उभे असून त्यांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. छत्रपती शाहू महाराज, संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथीच्या नाशिक विभागीय कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविणारे सारथीचे विभागीय केंद्र असल्याचे सांगितले.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ युवकांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम करेल. सारथी तरुणांचे करिअर घडवेल. वसतिगृहांचा विषय मार्गी लावला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. उद्घाटन सोहळ्यात छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाबाबत मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उपसमिती काम करीत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.परतीच्या पावसाने राज्यात पिकांचे मोठे नुकसान झाले असून युध्दपातळीवर पंचनामे करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले गेले आहेत.

हेही वाचा : नाशिक : संस्थेत कमी अन सत्कारातच अधिक वेळ; मविप्र पदाधिकाऱ्यांच्या सोहळ्यांचे अर्धशतक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नियमित कर्जफेड करणाऱ्या सहा लाख, ९० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शासनाने प्रत्येकी ५० हजार या प्रमाणे अडीच हजार कोटी रुपये जमा केले आहेत. पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे आजवर कधीही दिली न गेलेली विहित निकषापेक्षा दुप्पट मदत सरकारने दिल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. दोन हेक्टरचा निकष होता. त्याऐवजी तीन हेक्टर क्षेत्रापर्यंत मदत देण्यात आली. गोगलगाय, सततच्या पावसाने या निकषात न बसणाऱ्या पिकांच्या नुकसानीचाही भरपाई देताना विचार झाला असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्ह्यातील अनेक भागात आनंदाची शिधा पोहचली नसल्याच्या प्रश्नावर आतापर्यंत आठ तालुक्यात वितरण झाले असून दिवसभरात ती सर्वत्र दिली जाणार असल्याचे नमूद केले.