नाशिक : भाडेतत्वावर घेतलेल्या वाहनांची परस्पर विक्री करणाऱ्या सहा संशयितांनी फसवणूक केल्याची जाणीव झाल्यावर फसविलेल्या व्यक्तीने चतुरपणे संशयितांवरच डाव उलटवत त्यांना पकडून दिले. धुळे पोलिसांनी सहाही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दोन चारचाकी वाहने जप्त करण्यात आली. राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये मोटारी चालकाविना भाडेतत्वावर देणाऱ्या काही कंपन्या कार्यरत आहेत. अशा कंपन्यांकडून मोटारी घेऊन त्यांची परस्पर स्वस्तात विक्री करण्याचे काम ही टोळी करत होती. एकदा वाहन भाडेतत्वावर मिळवल्यावर ही टोळी ते विकण्याचे प्रयत्न करायचे. खरेदीदार मिळाल्यावर वाहन मालकाची फसवणूक करून वाहन परस्पर विकायचे, अशी या टोळीची पद्धत होती.

यासंदर्भात धुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिषेक पाटील (२९, रा. नांदगांव जि. नाशिक) यांना जुने वाहन खरेदी करायचे होते. त्यांनी जुने, परंतु वापरण्यास योग्य अशा वाहनाचा शोध सुरु केला. समाजमाध्यमात एक आलिशान वाहन विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती मिळाल्यावर खरेदी करण्यासाठी पाटील यांनी अरबाज शेख (२६), मोहंमद अझरुद्दीन रज्जाक (२५) आणि सय्यद अबरार (२६) यांच्याशी संपर्क साधला. तिघांनी पाटील यांना शिरुड चौफुली (ता. धुळे) येथे बोलवून वाहन दाखविले. वाहन कमी किंमतीत विकायचे असल्याचे आमिष दाखवून पाटील यांच्याकडून तीन लाख रुपये आगाऊ घेत त्यांच्याकडे वाहन सोपविले. वाहन नावावर केल्यानंतर उर्वरीत तीन लाख रुपये देण्याचे ठरल्यावर तीनही संशयित निघून गेले. पाटील यांनी उर्वरीत तीन लाख रुपये उपलब्ध झाल्यावर रक्कम चुकती करून वाहन नावावर करुन घेण्यासाठी संबंधितांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

साधारणपणे १० दिवसांनी मोहंमद नझर, मोहंमद सैफ आणि सय्यद शहा (सर्व रा. हैदराबाद) यांनी वाहनाला असलेल्या जीपीएसच्या माध्यमातून पाटील यांना गाठले. आपणाकडे असलेले वाहन आमच्या मालकीचे आणि आपणच या वाहनाचे मूळ मालक असल्याचे सांगितले. संबंधित वाहन चोरीस गेले होते, अशी माहिती त्यांनी पाटील यांना दिली. या संदर्भात तक्रार नोंदविली असल्याचेही त्यांनी सांगितल्याने पाटील यांची आपणास फसविण्यात आल्याची खात्री झाली. यानंतर संबंधित पाटील यांच्या ताब्यातून मोटार घेऊन निघून गेले.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पाटील यांनी वेगळे नाव सांगून पुन्हा संशतितांशी संपर्क साधला. वाहन खरेदी करायचे असल्याचे त्यांना सांगितले. संशयितांनी त्यांना एका वाहनाचे छायाचित्र व्हाॅटसअपवर दाखविले. आपणास हे वाहन खरेदी करायचे असल्याचे पाटील यांनी त्यांना सांगितले. या व्यवहारासाठी पाटील यांना सात फेब्रुवारी रोजी दुपारी शिरुड चौफुली (ता. धुळे) येथे संशयितांनी बोलावले. यावेळी पाटील यांनी तिघांना ओळखून आरडाओरड करत आजूबाजूच्या लोकांना बोलाविले. लोकांच्या मदतीने सर्व सहा जणांना पकडले. गस्ती पथकाच्या पोलिसांनीही धाव घेत सहाही संशयितांना पोलीस ठाण्यात नेले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अरबाज शेख (२६), मोहंमद अझरुद्दीन रज्जाक (२५), सय्यद अबरार (२६), मोहंमद नझर, मोहंमद सैफ आणि सय्यद शहा (सर्व रा. हैदराबाद) अशी संशयितांची नावे आहेत. ही कारवाई धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील यांनी अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. छाया पाटील, कुणाल पानपाटील, उमेश पवार, विशाल पाटील, ललीत खळगे, योगेश पाटील,अविनाश गहिवड, चेतन कंखरे, योगेश कोळी, धीरज सांगळे, सखाराम खांडेकर, राजु पावरा व भावेश झिरे यांचा या पथकात समावेश होता.