जळगाव – जिल्ह्यातील अनेक दिग्गज अजित पवार गटासह भाजपमध्ये गेल्यानंतर गलितगात्र अवस्था झालेल्या पक्षाला नवीन उभारी देण्यासह निष्ठावानांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शरद पवार गट आता झपाटून कामाला लागला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष बांधणी मजबूत करण्याकरीता गाव तिथे राष्ट्रवादी, या अभियानालाही चालना देण्यात आली आहे.

जळगाव आणि धरणगाव तालुक्यांचा समावेश असलेल्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात २००९ चा अपवाद वगळता एकदाही राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळू शकलेले नाही. शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांचा एकछत्री अंमल या मतदारसंघावर सातत्याने राहिला आहे. असे असताना, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पक्षावर निष्ठा ठेवून असलेल्या जुन्या-नव्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीशी जुळवून ठेवण्याचे काम अव्याहतपणे केले.

पक्षाचा कोणताही कार्यक्रम असो तो नेटाने पार पाडण्यासाठी त्यांनी प्रसंगी पदरमोड करण्याची तयारी ठेवली. त्यांच्यामुळे जळगाव ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीची पाळेमुळे घट्टपणे रूजण्यास मोठा हातभारही लागला. परंतु, सातत्याने पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर एक दिवस माजी मंत्री देवकर यांनीच शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देऊन अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला.

देवकर यांच्यासोबत जळगावसह धरणगाव तालुक्यातील अनेक जुन्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. पाठोपाठ वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.नितीन पाटील यांनीही धरणगाव तालुक्यातील काही पदाधिकाऱ्यांना सोबत घेत भाजपची वाट धरली. शरद पवार गटासाठी तो मोठा धक्काच होता. त्यातून सावरत असताना पक्ष सोडून गेलेल्यांना चपराक देत निष्ठावानांना महत्वाच्या पदावर संधी देण्याचे धोरण आता शरद पवार गटाने अवलंबले आहे. त्याची सुरूवात धरणगाव तालुक्यापासून करत असताना गावागावात जुन्या निष्ठावानांच्या भेटी घेण्यासह नव्या लोकांना पक्षाशी जोडण्याचे काम प्राधान्याने केले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद पवार गटाचे विचार तसेच धोरणे, लोकहिताचे विविध निर्णय यांची माहिती देतानाच पक्षाचा प्रचार व प्रसार करण्यावर देखील भर देण्यात येत आहे. धरणगाव तालुक्यातील साळवा-साकरे गटापासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनी त्याची सुरूवात करण्यात आली. गाव तिथे राष्ट्रवादी अभियानाच्या माध्यमातून मतदारसंघातील नागरिकांशी संपर्क साधताना पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या समस्या सुद्धा जाणून घेतल्या.

संपर्क अभियानात शरद पवार गटाचे धरणगाव तालुकाध्यक्ष संजय पाटील, कार्याध्यक्ष हितेंद्र पाटील, माजी युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, सोनवदचे माजी सरपंच उज्ज्वल पाटील, शहराध्यक्ष लक्ष्मण पाटील, उद्योजक एकनाथ पाटील, बांभोरी येथील पी. डी. नाना, जांभोरा येथील भगवान शिंदे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.