जळगाव : वादग्रस्त विधानांमुळे आधीच चर्चेत असलेले मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात ऑनलाईन रमी खेळत असल्याची चित्रफीत व्हायरल झाल्यानंतर चांगलेच चर्चेत आले होते. खाते बदल झाल्यानंतर त्यांच्यावरील अरिष्ट कमी झाल्याचे वाटत असले, तरी विरोधक त्यांना अधूनमधून लक्ष्य करत असल्याचे दिसून येतेच. जळगाव दौऱ्यावर येण्यापूर्वीही त्यांच्यावर शरद पवार गटाकडून शेती प्रश्नावरून जोरदार टीका करण्यात आली आहे.
सभागृहात ऑनलाइन तीन पत्ती रमी खेळल्याच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना गेल्या महिन्यात धुळे जिल्ह्यात महाविकास आघाडीकडून काळे झेंडे दाखवण्यात आले होते. त्या घटनेनंतर धास्तावलेल्या कोकाटे यांनी त्यांचा त्या वेळचा जळगाव जिल्हा दौरा अचानक रद्द देखील केला होता. मात्र, आता पुन्हा त्यांचा दौरा कार्यक्रम जळगाव जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून, रविवारी अजित पवार गटाच्या मेळाव्यास ते उपस्थित राहणार आहेत. गेल्या वेळचा अनुभव लक्षात घेता त्यांचा या वेळचा जळगाव जिल्हा दौरा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. ते उपस्थित राहतात की नाही, या विषयी देखील साशंकता व्यक्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे माणिकराव कोकाटे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथून मोटारीने जळगावकडे मेळाव्याच्या एक दिवस आधीच शनिवारी सायंकाळी प्रयाण करणार आहेत.
दरम्यान, मंत्री माणिकराव कोकाटे जळगावात दाखल होण्यापूर्वीच नामोल्लेख टाळून राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) त्यांच्यावर टीका करण्याची संधी साधल्याचे दिसून आले आहे. त्यास निमित्त ठरली आहे, जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती. पावसाने द़डी मारल्यानंतर जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात कष्टाने जगवलेली पिके माना टाकू लागल्याचे पाहून शेतकरी हवालदिल झाले होते. अशा स्थितीत पिकांना जीवदान देण्यासाठी गिरणा धरणाच्या पाण्याचे एक आवर्तन सोडण्याची मागणी धरणगाव तालुक्यातील शरद पवार गटाने जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. प्रत्यक्षात, धरणातून आवर्तन सुटण्यापूर्वीच निसर्गाला शेतकऱ्यांची दया आली. स्वातंत्र्य दिनी पडलेल्या पावसामुळे हवालदिल होऊन बसलेल्या शेतकऱ्यांना थोडाफार तरी दिलासा मिळाला.
महिनाभराच्या दडीनंतर पडलेल्या पावसाने आता कोमेजलेल्या पिकांना जीवदान मिळाले असले, तरी त्यापासून फार काही उत्पन्न मिळण्याची आशा मात्र मावळली आहे. त्यामुळे शासनाने उत्पादनातील संभाव्य घट लक्षात घेता पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करून संबंधित सर्व शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी शरद पवार गटाचे धरणगाव शहराध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी केली आहे. रमी सर्कलवर रमी खेळण्याइतके शेतकऱ्याचे जीवन सोपे नक्कीच नाही, असा टोलाही पाटील यांनी माणिकराव कोकाटे यांना पर्यायाने महायुतीच्या सरकारला त्या निमित्ताने हाणला आहे. शेतकरी असा जुगारी आहे, जो फक्त निसर्गाच्या भरोशावर आयुष्य पणाला लावतो. त्या जुगाराचा परिणाम कसाही आला तरी तो मागे हटत नाही. शेतकरी अपुऱ्या पावसामुळे आताही संकटात असल्याने त्याला साथ देणे गरजेचे असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.