नाशिक – मतदार यादीतील कथित घोळ आणि मत चोरीच्या विरोधात शनिवारी मुंबईत काढण्यात येणारा मोर्चाला भव्य स्वरुप देण्यासाठी विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मोर्चात सहभागी करण्यासाठी शिवसेना (उद्धव ठाकरे), मनसे, काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार) या पक्षांनी स्थानिक पातळीवर बैठका व उपक्रमांद्वारे जनजागृती केली. या घटनाक्रमात मोर्चात सहभागी होण्यासंदर्भात राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केेलेली सूचना राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.
निवडणूक आयोगाविरोधात मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी सर्वपक्षीय विरोधकांनी स्थानिक पातळीवर आठवडाभरापासून तयारी केली. मनसेच्या येथील राजगड कार्यालयात शहर व ग्रामीणची बैठक पार पडली. प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी निवडणुकीत कशा प्रकारे मत चोरी होते. मतदार यादीतील घोळ तसेच सत्ताधाऱ्यांकडून बनावट मतदार नोंदणी याविषयी माहिती दिली. मतचोरी विरोधात सर्वपक्षीय मोर्चात सर्व पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. याच दरम्यान नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात एक लाखाहून अधिक बनावट, दुबार मतदार असल्याकडे मनसेने प्रशासनाचे लक्ष वेधले.
तर काँग्रेसने नाशिकरोड येथे ‘वोट चोर-गद्दी छोड’ उपक्रमांतर्गत स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस प्रभारी ब्रीज किशोर दत्त यांनी निवडणूक आयोग भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत असल्याची टीका केली. या उपक्रमात जनतेच्या स्वाक्षऱ्या गोळा करून निवडणूक आयोग व राज्यपालांना निवेदन पाठविले जाणार आहे.
शिवसेना ठाकरेे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट असे सर्वच विरोधी पक्ष मोर्चा यशस्वी करण्यासाठी जय्यत तयारी करीत आहेत. मोर्चाच्या अनुषंगाने सर्वपक्षीयांनी सूचनाही दिल्या आहेत. यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचाही समावेश आहे. राज्यातील सर्व शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांना त्यांनी पत्र पाठविले आहे. मतदार यादीतील बनावट नावे दूर करण्यासाठी महाविकास आघाडीचा हा महामोर्चा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून या महामोर्चामध्ये नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी प्रचंड जनसमुदायासह उपस्थित रहावयाचे आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा मोर्चा यशस्वी करायचा आहे. तसेच मोर्चाला उपस्थित राहणाऱ्या कार्यकर्त्यांची पक्षातर्फे नोंद घेण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी म्हटले आहे. प्रदेशाध्यक्षांची सूचना नाशिकचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवली आहे. मोर्चात गर्दी जमवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील इच्छुकांना सहभागी करण्याचा प्रयत्न शिंदे यांनी नोंद घेण्याच्या उल्लेखातून केल्याची चर्चा पक्षाच्या वर्तुळात होत आहे.
