जळगाव : कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अस्वस्थता मांडण्यासाठी राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसकडून सोमवारी नाशिकमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात जळगामधील केळी आणि कापूस उत्पादकांची व्यथा मांडण्यासाठी पक्षाचे हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील सहभागी होणार आहेत.
नाशिक हा संपूर्ण देशात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन घेणारा जिल्हा आहे. तर जळगाव हा केळी आणि कापसाच्या उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा आहे. काही महिन्यांपासून कांद्याला भाव नसल्याने संबंधित शेतकरी अडचणीत आले आहेत. पावसामुळे नाशिकसह राज्यात हजारो हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाले. जळगाव जिल्ह्यातही गेल्या काही वर्षात कापसाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत रास्त भाव मिळणे मुश्किल झाले आहे. तर केळी उत्पादकांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई वेळेवर मिळू शकलेली नाही. तसेच, व्यापाऱ्यांनी संगमनत करून केळीचे भाव पाडल्याने संबंधित शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. दरम्यान, कांदा उत्पादकांची अस्वस्थता मांडण्यासाठी शरद पवार गटाने मोर्चासाठी नाशिकची निवड केली असताना, त्यात जळगामधील केळी आणि कापूस उत्पादकांची व्यथा मांडण्यासाठी जिल्ह्यातील हजारो पदाधिकारी व कार्यकर्तेही सहभागी होत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चे बांधणीसाठी शरद पवार हे पुन्हा सक्रिय झाले आहे. त्यानुसार, रविवारी राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थित राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यात जळगावमधील काही पदाधिकारी व कार्यकर्ते सुद्धा सहभागी झाले. सोमवारी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये निघणाऱ्या मोर्चातही जिल्ह्यातील सुमारे तीन हजार पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे, माजी आमदार राजीव देशमुख, संतोष चौधरी, डॉ. बी. एस. पाटील, प्रदेश सरचिटणीस ॲड.रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, युवक जिल्हाध्यक्ष विश्वजित पाटील, महानगर अध्यक्ष एजाज मलीक, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, महानगर अध्यक्षा मंगला पाटील यांचा समावेश असेल.
नाशिकमध्ये सोमवारी राष्ट्रवादीतर्फे आयोजित मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जळगावात गुरूवारी पक्षाचा मेळावा घेण्यात आला होता. त्या ठिकाणी उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी नाशिकमधील मेळाव्यात सहभागी होऊन जळगाव जिल्ह्यातील केळी व कापूस उत्पादकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचे आवाहन केले होते. त्याअनुषंगाने, पक्षाचे नेते आणि प्रमुख पदाधिकारी नाशिकच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी सोमवारी सकाळी सहा वाजता सर्व १५ तालुक्यांमधून रवाना होतील, अशी माहिती शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.