जळगाव – जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ.सतीश पाटील तसेच माजी आमदार कैलास पाटील, विधान परिषदेचे माजी सदस्य दिलीप सोनवणे, जिल्हा बँकेच्या माजी संचालक तिलोत्तमा पाटील यांनी शनिवारी मुंबईत अजित पवार गटात प्रवेश केला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सर्वांचे स्वागत केले.
यावेळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री इंद्रनील नाईक, अमळनेरचे आमदार अनिल पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार, कार्याध्यक्ष योगेश देसले, प्रदेश पदाधिकारी रवींद्र पाटील तसेच उमेश नेमाडे आदी उपस्थित होते. राजकारणाबरोबरच आपल्या भागातील प्रश्न सोडण्याकरिता सर्वांनी नेहमीच तत्पर राहायला हवे, असे यावेळी अजित पवार यांनी सांगितले.
पवार यांनी जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या अधोगतीवरही ताशेरे ओढले. दरवर्षी फक्त एक हजार कोटींचे कर्जवाटप जळगाव जिल्हा बँकेकडून केले जाते. वार्षिक नफ्याचे प्रमाणही जेमतेमच असते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. व्यासपीठावर उपस्थित बँकेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांना त्याबद्दल त्यांनी जाब देखील विचारला. आमच्याकडे साखर कारखाने नसल्याने कर्ज वाटप जास्त होत नाही, असे उत्तर संजय पवार यांनी दिल्यानंतर साखर कारखाने तुम्हीच बंद पाडले. ऊस उत्पादकांचे नुकसान केले, असे अजितदादांनी सुनावले.
आपण शरद पवार यांच्याबरोबर – एकनाथ खडसे
जळगाव जिल्ह्यातील दोन माजी मंत्री आणि दोन आमदार, काही पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटाची साथ सोडली असताना ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मात्र, कोणी कुठेही गेले तरी आपण शरद पवार यांच्या बरोबरच राहणार असल्याचे ‘लोकसत्ता’ ला सांगितले. पक्ष सोडून जाण्याच्या माझ्या काही अडचणी होत्या. हे लोक विकासासाठी अजित पवार गटात जात असल्याचे सांगत आहेत. मात्र, जुन्या लोकांनी अशी मध्येच शरद पवार यांची साथ सोडायला नको होती, अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली.