नाशिक : साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या श्री सप्तश्रृंगी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवास सोमवारपासून सुरुवात होत आहे. प्रशासनाकडून उत्सवाचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने उत्सव काळासाठी सप्तश्रृंग गडावर जाणाऱ्या भाविकांसाठी जादा बस सोडण्यात येणार आहेत. तसेच नाशिक ते सप्तश्रृंगी गड मार्गावर विद्युत बसच्या फेऱ्या देखील चालविल्या जातील.
नवरात्र उत्सवात सर्वच देवी मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी होत असते. कळवण तालुक्यातील श्री सप्तश्रृंग गडावर राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येतात. सप्तश्रृंगी देवी उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळखली जाते. नाशिकसह खान्देशातून भाविक मोठ्या संख्येने गडावर येतात. या काळात शेजारील गुजरातमधील भाविकांची संख्या लक्षणीय वाढते. उत्सवानिमित्त सोमवारी सकाळी जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय लाहोटी यांच्या हस्ते देवीची पंचामृत महापूजा होणार आहे. सकाळी साडेनऊ वाजता सप्तशृंगी मंदिरात घटस्थापना करत नवरात्रौत्सवाची सुरुवात होईल.
उत्सव काळात पालखी पूजन, नगर प्रदक्षिणा, शतचंडी याग, होमहवन, पूजा, कीर्ती ध्वजाची मिरवणूक, सप्तशृंगी देवीच्या शिखरावर ध्वजारोहण, महापूजा आदी कार्यक्रम होणार आहेत. यासाठी ट्रस्ट, ग्रामपंचायत, जिल्हा व पोलीस प्रशासनासह आरोग्य विभागाने तयारी केली आहे. वाहनतळ, आरोग्य, पाणी आदींचे नियोजन करण्यात आले आहे. उत्सवासाठी साधारणत २० लाख भाविक येण्याचा अंदाज आहे.
भाविकांची होणारी गर्दी पाहता राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने २२ सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत तसेच कोजागिरी पौर्णिमा उत्सवात पाच ते सात ऑक्टोबर या कालावधीत ३२० जादा बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात नांदुरी, नाशिक, मालेगाव, मनमाड, सटाणा आणि नांदगाव येथून ही जादा बससेवा आहे. या अनुषंगाने नवीन मध्यवर्ती बस स्थानक, नांदुरी पायथा तसेच सप्तश्रृंगी गड या ठिकाणी वाहतुक केंद्र उभारण्यात आली आहे. भाविकांची गर्दी पाहता नाशिक ते सप्तश्रृंगी गड मार्गावर विद्युत बस द्वारे ३० फेऱ्या चालवण्यात येणार आहे. या सर्व बसेस पहाटे पाच ते रात्री साडेनऊ या कालावधीत सुरू राहतील. भाविकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाने केले आहे.