धुळे : दिवसा सातत्याने खंडीत होणारा वीज पुरवठा आणि केवळ नाईलाज म्हणून रात्री उपलब्ध होणाऱ्या वीजेमुळे धोका पत्करणाऱ्या शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. तालुक्यातील धमाणे शिवारात उभारण्यात आलेल्या तीन मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण आज करण्यात आले. राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते हा प्रकल्प सुरू करण्यात आला.
या प्रकल्पामुळे बाम्हणे, धमाणे, चिलाणे, कुरुकवाडे, रहिमपूर आणि विखुरले या सहा गावांतील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा मिळणार आहे. हा प्रकल्प ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ अंतर्गत उभारण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित, स्थिर आणि स्वच्छ वीजपुरवठा करणे हा आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी रात्रीच्या धोकादायक वेळेत काम करण्याची गरज उरणार नाही, तर दिवसा सुरक्षित वातावरणात सिंचन करता येणार आहे.
या प्रकल्पामुळे बाम्हणे कक्षा अंतर्गत शेती वाहिनीला दिवसा वीज मिळणार असून सिंचन व्यवस्थेत मोठा बदल होणार आहे. त्यामुळे शेती उत्पादनात वाढ, पिकांची गुणवत्ता सुधारणा आणि शेतकऱ्यांचा वेळ व श्रम वाचणार आहेत.
कार्यकारी अभियंता भाऊसाहेब पाटील यांनी सांगितले की, हा सौरऊर्जा प्रकल्प १२ एकर क्षेत्रावर उभारला असून, तो पूर्ण क्षमतेने कार्यरत झाला आहे. येथे निर्माण होणारी वीज थेट ग्रिडमध्ये संप्रेषित केली जात असून, स्थानिक वीज वितरण प्रणाली अधिक स्थिर झाली आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या प्रकल्पाच्या कार्यान्वयनात महत्त्वाची भूमिका बजावली.
यावेळी योजनेची वैशिष्ट्ये सांगण्यात आले. शेतकऱ्यांना दिवसा स्थिर आणि नियमित वीजपुरवठा मिळणार असून सौरऊर्जेद्वारे नवीकरणीय, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मिती होणार आहे. शेतीसाठी स्वतंत्र सौरवाहिनीमुळे अखंडित पुरवठा केला जाणार असून स्थानिक वीज वितरण व्यवस्थेवरील ताण कमी होणार आहे. खास सिंचनासाठी दिवसा उपलब्ध वीजेमुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रमांची बचत होईलच पण सर्पदंश,बिबट्या सारख्या वन्य प्राण्यांपासून शेतकरी आणि शेतमजुरांना स्वतः वरील संकट टळणार आहे. वीज निर्मिती व पुरवठा प्रक्रियेत हरित ऊर्जेचा वापर होईलच शिवाय ऊर्जेतील स्वावलंबन आणि ग्रामीण भागात ऊर्जा सुरक्षा प्राप्त होणार आहे.या प्रकल्पामुळे शिंदखेडा तालुका “दिवसा वीजपुरवठा असलेला आदर्श तालुका” बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असून, सौरऊर्जेच्या वापरामुळे पर्यावरण संवर्धनासही मोठी चालना मिळणार आहे.
