धुळे : ग्रामीण भागाचा अपवाद वगळता विनाभेसळयुक्त दूध मिळणे अवघड झाले आहे. अनेक विक्रेते दुधात पाणी टाकत असल्याने दुधाचा दर्जा खालावतो. काही विक्रेते दूध घट्ट दिसावे, यासाठी त्यात रासायनिक घटकांचा वापर करीत असल्याचे याआधी काही ठिकाणी उघड झाले आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे दूध घ्यावे तरी कोणते, असा प्रश्न उपस्थित होतो.

धुळे जिल्हा दूध उत्पादनासाठी ओळखला जातो. परंतु, याच जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील करवंद येथील एका महिलेने खरेदी केलेल्या दुधावरून गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. करवंद येथील एका महिलेने २१ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजनासाठी शिरपूर शहरातील जमजम दुकानातून दूध खरेदी केले. त्या दुधापासून रात्री बासुंदी बनवून सर्वांनी सेवन केले. उर्वरित दूध फ्रिजमध्ये ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी दूध उकळताना अक्षरशः रबरासारखे घट्ट झाले. हा प्रकार पाहून संबंधित महिला आश्चर्यचकित झाली. तिने हा संपूर्ण प्रकार चित्रफितीद्वारे समाज माध्यमात टाकला. दूध उकळल्यावर ते रबरा सारखे का झाले, हे दूध भेसळयुक्त आहे का, अथवा काही रासायनिक प्रक्रिया झाल्याने ते खराब झाले का, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी हा प्रकार पाहून आश्चर्य व्यक्त केले असून, संबंधित दूध विक्रेत्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे.

याबाबत विचारणा केली असता संबंधित ‘जमजम’ दूध विक्री केंद्राने कोणतेही उत्तर देण्यास टाळाटाळ केली. या चित्रफितीमुळे अन्न व औषध प्रशासन विभाग खडबडून जागा झाला. विभागाचे अधिकारी किशोर बाविस्कर यांनी सांगितले की, या घटनेनंतर शिरपूर शहरातील संबंधित दूध विक्री केंद्रावर तपासणी करण्यात आली आहे. जळगाव येथून आलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या विशेष पथकाने ‘जमजम’ दूध केंद्रावर छापा टाकून दुधाचे नमुने संकलित केले आहेत.

नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून, पंधरा दिवसांनंतर त्याचा अहवाल प्राप्त होईल. अहवाल आल्यानंतर दूध भेसळयुक्त आहे की नाही, हे स्पष्ट होईल. त्यानंतर संबंधित विक्रेत्यावर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी किशोर बाविस्कर यांनी दिली. या घटनेमुळे शहरात तसेच धुळे जिल्ह्यात दूध गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात दूध विक्रीत मोठी वाढ होते. अशा काळात जर भेसळयुक्त दूध विकले जात असेल, तर ग्राहकांच्या आरोग्याशी गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. अन्न व औषध प्रशासन विभागाने इतरही विक्री केंद्रांवरील दुधाची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.