नाशिक : थायरॉईड ग्रंथीबाबतच्या टी ३, टी ४ या हार्मोनचे प्रमाण तपासणीबाबत येथील रवींद्र विद्या प्रसारक मंडळाच्या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या शितल पाटील (पवार) यांनी केलेल्या संशोधनाला डिझाईन पेटंट प्राप्त झाले आहे. नुकतेच त्यांनी नैसर्गिकरीत्या आढळणारे घटक वापरून औषधे, सौंदर्य प्रसाधने दीर्घकाळ टिकविता येतात, असेही संशोधन पूर्ण केले.

प्राचार्या शितल पाटील (पवार) यांनी फार्मास्युटिकल केमिस्ट्री या विषयात नैसर्गिकरित्या होणाऱ्या संरक्षकांचे गुणात्मक आणि परिमाणात्मक विश्लेषण आणि कृत्रिम संरक्षकांशी तुलनात्मक अभ्यास या विषयावर संशोधन केले. आधुनिक काळात कोणतीही औषधे, सौदर्य प्रसाधने यामध्ये दीर्घकाळ टिकण्यासाठी रासायनिक घटक वापरले जातात. सततच्या वापराने या घटकांचा दीर्घकाळानंतर मानवी शरीरावर दुष्परिणाम होतो.

परंतु अशी रसायने न वापरल्यास त्या प्रसाधनांची दीर्घकाळ टिकून राहण्याची क्षमता कमी होते. म्हणून, अशी रासायनिक घटके बदलून त्यामध्ये नैसर्गिकरीत्या आढळणारे घटक वापरून (पुदिन्यात आढळणारे मेंथॉल, पुलेगोन) अशी औषधे, सौंदर्य प्रसाधने दीर्घकाळ टिकविता येतात, असे संशोधन त्यांनी केले. या संशोधनपर शोधनिबंधासाठी त्यांना पीएचडीही प्राप्त झाली.

थायराॅईड ग्रंथीबाबतच्या त्यांच्या संशोधनास भारत सरकारतर्फे पेटंटही प्राप्त झाले आहे. थायरॉईडसाठी रक्ताचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत टी ३, टी ४ ची पातळी तपासली जाते. प्राचार्या शितल पाटील (पवार) यांनी रक्ताचे नमुने न घेता ही पातळी तपासणीची पद्धत विकसित केली. त्या अंतर्गत मानेसाठी विशिष्ट पट्टा (बेल्ट) व नियंत्रक युनिट (कंट्रोलर) तयार केले. मानेवर थायरॉईड ग्रंथी असतात.तिथे हा पट्टा लावून काही वेळात टी ३, टी ४ हार्मोनचे प्रमाण नियंत्रक युनिटवर लक्षात येते. हे डिझाईन पेटंट असल्याचे त्यांनी सांगितले. या दोन्ही यशाबाबत रवींद्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. मनोज पिंगळे यांनी अभिनंदन केले.