लोकसत्ता वार्ताहर

मनमाड: जिल्ह्यातील मालेगांव, सिन्नर, येवल्यासह नांदगाव तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश अपेक्षित असताना त्यातून नांदगावला वगळण्यात आल्याने तालुक्यात नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नांदगावला वगळण्यात आल्याची तक्रार शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. नांदगावचा तातडीने दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मुंबई येथे भेट घेऊन केली आहे.

नांदगावचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यासाठी निकषानुसार प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मदत व पुनर्वसन विभागाला दिले आहेत. ट्रिगर- १, ट्रिगर- २ या उपाय योजनांमध्ये नांदगाव तालुका बसत असतानाही प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नांदगाव तालुक्यास वगळण्यात आल्याचे आमदार कांदे यांचे म्हणणे आहे.

आणखी वाचा-नाशिक: पाणीप्रश्नी देवयानी फरांदे यांच्या भूमिकेचे शेतकऱ्यांकडून स्वागत

नांदगाव मतदार संघातील नांदगाव आणि मालेगांव तालुक्यात अत्यंत कमी म्हणजे १८६.३ मिलीमीटर पाऊस झाल्याने तालुक्याची आणेवारी ३६ पैशांपर्यंत आहे. तर पावसाअभावी टंचाईग्रस्त ३४ गावे व १५७ वाड्या वस्त्यांसाठी दररोज टँकरच्या ८३ फेऱ्या सुरू आहेत. खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये नांदगाव तालुक्यांत प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत सर्वेक्षण करण्यात आले असून तालुक्यांतील सर्व आठही महसूल मंडळांत अपेक्षित सरासरी उत्पादकता २५ टक्क्यांपेक्षा कमी आली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मका, कापूस, बाजरी, सोयाबीन, कडधान्य पिकांचे होणारे नुकसान हे ७५ ते ८० टक्क्यांपेक्षाही जास्त असल्याचे दिसून आल्याने हे क्षेत्र पावसाअभावी करपले आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जनावरांच्या चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. धरणे, तलाव, बंधारे न भरल्याने पिण्याचे पाणी तसेच खरीप हंगामासोबत रब्बी हंगाम देखील वाया जाणार असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही वस्तुस्थिती असतांना नांदगाव मतदार संघावर अन्याय होत असल्याची भावना जनतेत निर्माण होऊन असंतोष पसरला आहे. त्यामुळे नांदगाव मतदारसंघाचा राज्य शासनाने घोषित केलेल्या उपाययोजनांत समावेश करून तो दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी कांदे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.