नाशिक – कुंभमेळ्यापूर्वी तयारीच्या अनुषंगाने शहरात रस्त्यांच्या कामांकडे लक्ष दिले जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मोठ्या प्रमाणात कामे करत आहेत. या कामांना खीळ बसू नये याची काळजी घेतली जात असल्याचे मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सांगितले.
येथील द्वारका चौकातील वाहतूक परिस्थितीची त्यांनी पाहणी केली. द्वारका चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. द्वारका आणि सारडा सर्कल रस्ता दुस्स्तीसाठी सर्वेक्षणाचे काम मंजूर करण्यात आले आहे. पुणे रोड आणि सारडा सर्कल यांना जोडणाऱ्या रस्त्याच्या सर्वेक्षण प्रस्तावाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने मान्यता दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महामार्ग प्राधिकरणकडून नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा केल्या जात आहेत, असे भोसले यांनी सांगितले.
कुंभमेळ्यासाठी प्राप्त निधीतून पहिल्या टप्प्यातील कामे सुरू झाली असून रस्त्यांची कामे १८ महिन्यात पुर्ण करण्याचा प्रयत्न आहे. दुसऱ्या टप्प्यात प्राधिकरणकडून ५७० कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. द्वारका परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी नियोजन सुरू आहे. कामे वेळेत होतील, अशी व्यवस्था केली आहे. भूसंपादनासारख्या प्रश्नांवर निर्णय घेतले जात आहेत. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून निर्णय घेतले जात आहेत. नाशिक आणि प्रयागराज येथील कुंभमेळ्याची तुलना केली जाईल. त्यामुळे आपण काम करून निर्णय घेत आहोत. सर्व कामांच्या त्याच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रीत करण्यात येईल. कुंभमेळा काळात ओझर विमानतळ येथे नवीन वाहनतळ, प्रवासी सुविधा, तसेच विमान उड्डाणासाठी धावपट्टी वाढविण्याची योजना तयार करण्यात आली आहे. पूर्वी बांधलेल्या विमानतळाच्या रचनेशी सुसंगत असा‘गरुडपक्षी‘ आकार राखून पुढील बांधकाम होईल. प्रयागराज कुंभमेळ्यात एका दिवसात तब्बल २३ हजार प्रवासी विमानाने दाखल झाले होते, याचा विचार करूनच नाशिक विमानतळाचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती भोसले यांनी दिली.
