नाशिक – सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी असल्याने दोन्ही बाजूंच्या शिवसैनिकांच्या नजरा टीव्हीकडे लागलेल्या. लवकरच सुनावणीला सुरुवात होईल, असे सांगण्यात आल्याने उत्सुकता अधिकच ताणली गेली. परंतु, लगेचच पुन्हा नेहमीप्रमाणे पुढील तारीख मिळाल्याने शिवसैनिकांमध्ये निराशा पसरली.
अर्थात, शिवसेना उध्दव ठाकरे गटात ही निराशा अधिक आहे. कारण, अनेक वर्षांपासून ते तारीख पे तारीख चा खेळ पाहत आहेत. नाशिक शहरातील सर्वसामान्य शिवसैनिकांनी याप्रकाराविषयी नाराजी व्यक्त करुन सर्वोच्च न्यायालयाने एकदाचा निकाल लावून टाकावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
शिवसेना दुभंगल्यानंतर पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले. तेव्हांपासून उध्दव ठाकरे गट न्यायालयाकडून न्याय मिळेल, या अपेक्षेने लढा देत आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेल्यापासून वारंवार या प्रकरणावर सुनावणीसाठी पुढील तारीख मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाबाबतच्या प्रकरणाची अंतिम सुनावणी आठ ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.
आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, ही सुनावणी होणार असल्याने शिवसेनेचे दोन्ही गटच नव्हे तर, महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांचे या सुनावणीकडे लक्ष लागून होते. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय अंतिम निकाल देईल, अशी सर्वांनाच आशा होती.
परंतु, यावेळीही सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाबाबत अंतिम युक्तिवाद होऊ शकला नाही. आता सर्वोच्च न्यायालयात १२ नोव्हेंबरला याप्रकरणाची पुढील सुनावणी आहे. त्यामुळे या खटल्यास लागलेले तारीख पे तारीखचे ग्रहण अजूनही कायम आहे.
नाशिक शहरातही सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीविषयी उत्सुकता होती. परंतु, पुन्हा एकदा सर्वांची निराशा झाली. याविषयी पंचवटीतील अमृतधाम परिसरातील अक्षय नारकर या ठाकरे गटाच्या शिवसैनिकाला आपली नाराजी लपविता आली नाही. यावेळीतरी न्यायालयात सुनावणी होईल, अशी अपेक्षा होती. त्यामुळे सकाळपासून प्रचंड उत्सुकता होती, असे त्यांनी सांगितले.
सुनावणी कधी होईल, याची निश्चित वेळ माहीत नसल्याने टीव्हीसमोरच बसून राहिलो. थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होईल, असे सांगण्यात आल्यावर उत्सुकता शिगेला पोहचली. परंतु, लगेचच सुनावणी पुन्हा पुढे ढकलली गेल्याची बातमी दिली गेली. त्यामुळे हा खेळ अजून किती दिवस चालेल, असा प्रश्न निर्माण झाला असल्याचे नारकर यांनी सांगितले. एकदाचा काय तो निकाल लागला म्हणजे सर्वांसाठीच योग्य राहील, असे त्यांनी नमूद केले.
शिवसेना शिंदे गटाचे सिडकोतील कार्यकर्ते बाळासाहेब भामरे यांनीही तारीख पे तारीख न देता एकदाचा निकाल लावावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. सध्या आमच्याकडेच नाव आणि धनुष्यबाण चिन्ह असल्याने आम्हांला निकाल कधीही लागो, फरक पडणार नाही, असेही त्यांनी सांगितले.