धुळे – महापालिकेचे शहर अभियंता निवृत्त झाल्यावरही तब्बल १६ महिन्यांपासून त्यांच्या दालनाला कुलूप असण्यामागे काय रहस्य आहे, याची सर्वांनाच उत्सुकता असून त्यासंदर्भात बुधवारी शिवसेनेने (उध्दव ठाकरे) प्रश्न उपस्थित केले आहेत.
धुळे महानगर पालिकेचे शहर अभियंता कैलास शिंदे हे ३१ मार्च २०२४ रोजी निवृत्त झाले. निवृत्तीस १६ महिने झाले असले तरी कुलूप ठोकलेले त्यांचे दालन अद्याप आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी अन्य दुसऱ्या अधिकाऱ्याला का वर्ग केले नाही, असा प्रश्न ठाकरे गटाने निवेदनाव्दारे उपस्थित केला आहे. शहर अभियंता कैलास शिंदे निवृत्त होत असताना त्या पदावर काम करू शकणाऱ्या अन्य व्यक्तीकडे या पदाची जबाबदारी सोपविण्याचे प्रशासकीय सोपस्कार पार पाडण्यात आले की नाहीत, याबद्दलच साशंकता आहे. यामुळे निवृत्त होताना शिंदे यांनी शहर अभियंता पदाची सूत्रे कुणाकडे सोपविली, यासंबंधीची कागदपत्रे आयुक्त यांनी जाहीर करावीत, निवृत्त होताना शहर अभियंता यांच्याकडे असलेल्या विविध प्रकरणाचे पुढे काय झाले, याबद्दलही साशंकता असून या संशयास्पद दालनातील प्रकरणे शोधण्यासाठी रात्री अपरात्री कोण जात होते, असाही प्रश्न पत्रकातून करण्यात आला आहे.
दालनातील जवळपास १२५ फाईलमधील अनेक कागदपत्रे गहाळ झाली असून सद्यपरिस्थितीत ५० च्या आसपास प्रकरणे (फाईल) त्या ठिकाणी उपलब्ध असल्याचे म्हटले जाते. उपलब्ध दस्तावेज आणि त्यातील कागदपत्रे गहाळ झाल्याचाही संशय निवेदनातून व्यक्त करण्यात आला असून भविष्यात काही उद्भवले तर येथील सीसीटीव्ही चित्रण महत्वाचे ठरणार आहे, असे सूचित करण्यात आले आहे.
महानगरपालिकेतील या संशयास्पद बंद दालनाचा आधार घेवून मोठा अपहार झाला तर कुठली कागदपत्रे खरी आणि खोटी समजावीत, याबद्दल साशंकता वाढू शकेल. सेवानिवृत्त होण्याच्या ३९ दिवसांआधी कैलास शिंदे यांना कायम नेमणुकीचे आदेश देण्यात आले. निवृतीच्या केवळ ३९ दिवसांआधीच प्रशासकीय सेवेत कायम करण्यात आले. आश्चर्य म्हणजे निवृत्तीच्या दिवशीच कैलास शिंदे यांना निवृत्तीनंतरचे सर्व वेतन व इतर भत्तेही तात्काळ लागू करण्यात आले. यापोटी देण्यात येणारे लाभ (पैसे) निवृत्तीच्या दिवशी त्यांना चुकते करण्यात आले. आता निवृत्ती वेतनाचा लाभ सुरु आहे.
निवृत्त शहर अभियंता शिंदे यांच्यावर आयुक्तांची अशी विशेष मेहेरनजर असली तरी शिंदे आता महापालिकेच्या प्रशासनात राहिलेले नाहीत. यामुळे त्यांच्या कारकिर्दीत असलेल्या त्यांच्या ताब्यातील दालन अन्यअधिकाऱ्यासाठी उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे निवेदनात ठाकरे गटाने म्हटले आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, भगवान करनकाळ,उपजिल्हा प्रमुख नरेंद्र परदेशी, महानगरप्रमुख धीरज पाटील आदींनी हे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.
धुळे शहर अभियंता यांच्या दालनाला कुलूप आहे. तेथील सर्वच प्रकरणे स्कॅन करून सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. संशयास्पद असे काहीही नाही. जेंव्हा त्यांच्या जागी अन्य कुणाची नेमणूक होईल तेंव्हा ते दालन खुले करून नव्या अधिकाऱ्यासाठी तेच उपलब्ध करून देण्यात येईल. अशा एखाद्या विषयात केवळ संशयाची राळ उडविणे बरे नाही. – अमिता दगडे-पाटील, आयुक्त धुळे महानगर पालिका.