नाशिक – हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीसह इतर काही कंपन्यांचा घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याचा फटका नाशिक, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरमधील हजारो ग्राहकांना बसला आहे. १० ते् १५ दिवसांपासून नोंदणी करूनही सिलिंडर मिळत नसल्याने नवरात्रौत्सवात ग्राहकांंना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. गॅस उपलब्धता, पुरवठ्यातील अडचणींमुळे तुटवडा निर्माण झाल्याचे सांगितले जाते. आता गॅसचा पुरवठा सुरळीत होत असून परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल, असा दावा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून केला जातो.
हिदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे (एचपीसीएल) जिल्ह्यात ४१ वितरक आहेत. कंपनीच्या सिन्नर येथील प्रकल्पात सिलिंडरमध्ये गॅस भरून तो नाशिकसह आसपासच्या भागात वितरित केला जातो. जिल्ह्यात दररोज ४५ मालमोटारींतून एलपीजी गॅस सिलिंडरचे वितरण केेले जाते. उर्वरित वाहने अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात सिलिंडर पुरवितात. सिन्नरच्या प्रकल्पात गॅसची उपलब्धता कमी झाल्यामुळे उपरोक्त भागात टंचाईची स्थिती निर्माण झाली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ते मान्य केले. रस्ता मार्गाने सिन्नरच्या प्रकल्पात एलपीजी गॅस आणला जातो. पुण्यासारख्या ज्या ठिकाणी थेट वाहिनी आहे, तिथे तुटवडा भासला नसल्याचे सांगितले जाते. १० ते १२ दिवसांपासून एलपीजी गॅसच्या वाहतुकीत अडचणी नि्र्माण झाल्या होत्या. त्यामुळे सिन्नर प्रकल्पात गॅस उपलब्धता ५० ते ६० टक्क्यांनी कमी झाली. परिणामी गॅस सिलिंडर वितरण विस्कळीत झाले. सद्यस्थितीत वितरकांना ग्राहकांसाठी सिलिंडर उपलब्ध करणे जिकिरीचे ठरले आहे. नवरात्रौत्सवात ही स्थिती निर्माण झाल्यामुळे ग्राहकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. आगावू नोंदणी करणाऱ्या काही ग्राहकांनी वितरकांना जाब विचारला असता त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना वितरकांच्या नाकीनऊ आले आहे.
सिन्नरच्या एचपीसीएल प्रकल्पातून दैनंदिन सुमारे ७० मालमोटारी नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर भागात घरगुती गॅस सिलिंडर वितरण करतात. रविवारी ३०० मेट्रीक टन तर, सोमवारी ३५० मेट्रीक टन एलपीजीचे वितरण करण्यात आल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. एलपीजी सिलिंडरचा पुरवठा सुरळीत होत असून लवकरच स्थिती पूर्वपदावर येईल, असा दावा संबंधितांकडून केला जात आहे. मागील काही दिवस गॅसचा तुटवडा होता. या काळात ग्राहकांची प्रतिक्षा यादी वाढत गेली. ही प्रतिक्षा यादी संपुष्टात येण्यास काही कालावधी लागू शकतो. त्यानंतर परिस्थिती सर्वसाधारण होईल, असे कंपनीच्या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे केवळ एचपीसीएलच नव्हे तर, इतरही कंपन्यांसंदर्भात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
काही दिवसांपूर्वी बीपीसीएल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी प्रशासनास पत्र दिले होते. गॅसच्या वाहतुकीशी संबंधित विषयावरून काही प्रश्न उद्भवले होते. ही बाब लक्षात घेऊन सिन्नरचे तहसीलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांनी प्रकल्पस्थळी भेट दिली. वाहतूकदार आणि कंपनी प्रतिनिधींची चर्चा घडवून समन्वयाने तोडगा काढला. सामोपचाराने तो प्रश्न मिटविण्यात आला आहे.- कैलास पवार (जिल्हा पुरवठा अधिकारी, नाशिक)
