लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : नांदगाव विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करणारे राष्ट्रवादीचे (अजित पवार) माजी पदाधिकारी समीर भुजबळ हे पराभूत झाल्यानंतर पुन्हा या पक्षाचे ज्येष्ठ नेते, काका छगन भुजबळ यांच्याबरोबर सक्रिय झाले आहेत. समीर हे सोबत होते, आहेत आणि राहतील, अशा शब्दांत काकांनी पुतण्याची पाठराखण केल्यामुळे राष्ट्रवादीत (अजित पवार) नव्याने त्यांचे पुनर्वसन होण्याचे संकेत मिळत आहेत.

स्थानिक राजकारणात शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. विधानसभा निवडणुकीत समीर भुजबळ हे मैदानात उतरल्याने उभयतांमध्ये पराकोटीचे मतभेद झाले होते. नांदगावमधील बंडखोरीचे पडसाद नांदगावच नव्हे तर, जिल्ह्यातील अन्य मतदारसंघात उमटले. राष्ट्रवादीच्या (अजित पवार) मुंबई शहराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन समीर भुजबळ यांनी नांदगावमधून अपक्ष उमेदवारी केली होती. तेव्हापासून छगन भुजबळ यांनी काहिसे अलिप्त धोरण स्वीकारत त्यांचे निवडणूक लढवणे ही बंडखोरी नसल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न केला. पक्षाचा राजीनामा देऊन ते निवडणूक लढत असून शिंदे गटाने देवळालीत अधिकृत उमेदवार दिल्याकडे काकांनी लक्ष वेधले होते. नांदगावमधील या उमेदवारीने कांदे-भुजबळ वाद पुन्हा उफाळून आला. परस्परांवर आरोप-प्रत्यारोप झाले. हे वाद प्रचारासह मतदानाच्या दिवशी समर्थकांना धक्काबुक्की, धमक्यांपर्यंत गेले होते. निवडणुकीत कांदे यांनी भुजबळ यांना पराभूत करुन काका-पुतण्याला एकाचवेळी शह दिला.

आणखी वाचा-दादा भुसे उपमुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधानसभा निवडणुकीआधी छगन भुजबळ यांनी पुत्र पंकज यांची विधान परिषदेवर वर्णी लावली होती. पराभूत झालेले पुतणे समीर भुजबळ यांचे पुनर्वसन आता कुठे, कसे करणार, याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. गुरुवारी महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त मुंबई नाका येथे फुले स्मारकात छगन भुजबळ यांनी अभिवादन केले. यावेळी आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ उपस्थित होते. या संदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नावर छगन भुजबळ यांनी समीर हे बरोबर होते, आहेत आणि उद्याही राहतील, अशा मोजक्याच शब्दांत काय ते सांगून टाकले.