जळगाव – शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोने आणि चांदीचे दर गेल्या दिवसांपासून सातत्याने नवीन उच्चांक करताना दिसत आहे. सोमवारी घटस्थापनेच्या दिवशीही जीएसटीची नवीन रचना लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर सोन्याने पुन्हा नवीन विक्रम केल्याचे दिसून आले. तुलनेत चांदीचे दर स्थिर राहिले.
पितृपक्षाची सांगता होऊन शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात झाल्यानंतर सगळीकडे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. घरोघरी घटस्थापना करण्यात आली असून, बाजारपेठ सजली आहे. विविध साहित्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. दरम्यान, केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन वस्तू व सेवा कराचा थेट परिणाम बाजारपेठेवर लगेच जाणवलेला नाही.
मात्र, सोन्याच्या दराने केलेल्या नवीन उच्चांकाने ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. नवरात्रोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करणे परंपरेचा भाग मानला जातो. पण सोमवारी पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतींमध्ये निर्माण झालेल्या तेजीमुळे अनेकांना एक पाऊल मागे घ्यावे लागले. जागतिक आर्थिक घडामोडी, आयात शुल्कातील वाढ आणि कर रचनेतील बदल, यामुळे सोन्याच्या दराने नवीन उच्चांक केल्याचे जाणकारांनी सांगितले.
तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेतील चलनवाढीच्या आकडेवारीकडे आणि फेडरल रिझर्व्हच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विधानांकडे आता गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. या घडामोडींच्या आधारे भविष्यातील धोरणात्मक दिशा स्पष्ट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याच कारणामुळे सोन्याच्या किमती सध्या विक्रमी उच्चांकाच्या जवळ पोहोचल्या आहेत.
जागतिक भू-राजकीय तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या शुल्कांचे आर्थिक परिणाम तसेच बाजारातील अनिश्चिततेमुळे निर्माण झालेली सुरक्षित गुंतवणुकीची मागणी, या सर्व घटकांचा सोन्याला भक्कम आधार मिळत आहे. याशिवाय, मध्यवर्ती बँकांची सातत्यपूर्ण खरेदी आणि गोल्ड ईटीएफमध्ये वाढलेली आवक, या महत्त्वाच्या घटकांमुळे गुंतवणुकदारांचा कल सोन्याकडे वाढला आहे.
जळगावमध्ये शनिवारी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख १४ हजार ८४५ रूपयांच्या उच्चांकावर होते. सोमवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा ५१५ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख १५ हजार ३६० रूपयांच्या नव्या उच्चांकावर पोहोचले. सुवर्ण बाजारपेठेत एक सप्टेंबरला सोन्याचे दर एक लाख आठ हजार ४५९ रूपयांपर्यंत होते. त्यानंतर कमी-अधिक फरकाने सातत्याने दरवाढ सुरूच राहिल्याने तीन आठवड्याच्या कालावधीत सोन्यात तब्बल ६९०० रूपयांची वाढ नोंदवली गेली.
चांदीचे दर स्थिर
जळगावमध्ये शनिवारी चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख ३६ हजार ९९० रूपयांच्या उच्चांकावर पोहोचले होते. सोमवारी घटस्थापनेच्या दिवशी सकाळी बाजार उघडताच कोणतीच वाढ अथवा घट दरात नोंदविण्यात आली नाही. त्यामुळे चांदीचे दर स्थिर राहिले.