जळगाव – अमळनेर येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात खान्देशातील लोककला आणि लोकसंगीतांचे पारंपरिक पद्धतीने सादरीकरण होणार असून, त्यातून संमेलनात खान्देशी संस्कृतीचे दर्शन घडेल, असा विश्‍वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयातील पूज्य साने गुरुजी साहित्यनगरीत दोन ते चार फेब्रुवारी या कालावधीत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे साहित्य संमेलन होत असून, तयारी आता पूर्णत्वास आली आहे. तीन फेब्रुवारीला दुपारी २.३० ते ४.३० या वेळेत बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे सभागृहात लोककला व लोकसंगीत कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. कार्यक्रमांचे संयोजन बापू हटकर व रमेश धनगर करणार आहेत.

कार्यक्रमात खान्देशी, बंजारा, धनगरी, आदिवासींचे पावरी, नंदीबैल, डोंगर्‍यादेव वळीत या नृत्यांबरोबरच खान्देशी वन्हे, तमाशा बतावणी, टिंगरीवाला, गोंधळ, भारूड, शाहिरी, संबळ, पावरी, खान्देशातील लोकगीते; ज्यात आखाजी, कानबाई, गौराई, लग्नाची गाणी आदी लोकगीतांचेही सादरीकरण होणार आहे. यात कर्ण जन्मानी कहानी हे भावस्पर्शी अहिराणी काव्यमय सादरीकरण खास आकर्षण राहणार आहे. या सर्व लोककला प्रकारांतून १५० लोककलाकारांना संधी मिळणार आहे, असे संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, आयोजन समितीचे रमेश पवार, संयोजक बापूसाहेब हटकर, रमेश धनगर, वसुंधरा लांडगे यांनी सांगितले.

हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात पुरोगामी पुस्तकांच्या पताका लावलेल्या नांगराने भूमिपूजन, विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची तयारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याच दिवशी कविवर्य ना. धों. महानोर सभागृहात दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत खान्देशी बोलीभाषांवर परिसंवाद होणार असून, यात अहिराणी, तावडी, भिल्ली, लेवा गणबोली, गुर्जर या बोलीभाषांचा समावेश करण्यात आला आहे. डॉ. रमेश सूर्यवंशी (अहिराणी), अशोक कोळी (तावडी), डॉ. पुष्पा गावित (भिल्ली), डॉ. जतीनकुमार मेढे (लेवा गणबोली), डॉ. सविता पटेल (गुर्जर) हे सहभागी होतील. रात्री आठ ते १० या वेळेत खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी सभागृहात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या रचनांवर आधारित अरे संसार संसार हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. यात परिवर्तन ग्रुपतर्फे ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, हर्षल पाटील व सहकलाकार सहभागी होतील.