नाशिक : मुंबईत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेले आंदोलन आणि त्यांच्या मागण्यांना राज्य सरकारने दिलेला प्रतिसाद, यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. ओबीसी नेते, जे याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण करताना दिसत होते, त्यांचा सूर अचानक बदलला आहे. या आंदोलनाने कोणाला काय दिले, याविषयी यापुढेही काही दिवस काथ्याकूट होत राहील.

परंतु, राष्ट्रवादीचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते आणि क्रीडामंत्री ॲड. माणिक कोकाटे यांचे पक्षात पुन्हा एकदा स्थान बळकट करण्यास या आंदोलनाने मदत केली आहे. कोकाटे हे कृषिमंत्री असताना अनेक वेळा टोकाच्या वादात सापडले असतानाही अजित पवार हे त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. मनोज जरांगे यांच्याशी मुंबईतील आंदोलनात अजित पवार गटातर्फे चर्चा करण्यासाठी कोकाटे यांच्या नावालाच प्राधान्य देण्यात आले. या सर्व घडामोडींमुळे कोकाटे हे पुन्हा एकदा जम बसविण्याच्या स्थितीत आहेत.

मुंबईतील मनोज जरांगे यांचे आंदोलन वेगवेगळ्या अर्थाने विलक्षण ठरले. अनेक वर्षांनी एखाद्या आंदोलनामुळे मुंबईची कोंडी झाल्याचे दिसले. मराठा आंदोलकांची संख्या आणि रेटा पाहून प्रशासन भांबावले. पहिले दोन दिवस आंदोलकांना मिळणारी रसद बंद करण्याचे प्रयत्न करुन पाहण्यात आले. परंतु, त्याचा उलट परिणाम झाला. राज्याच्या ग्रामीण भागातून अन्न, खाद्यपदार्थांची वाहनेच्या वाहने मुंबईत धडकू लागली. आंदोलनामुळे मुंबईकरांचे होणारे हाल पाहून अखेर न्यायालयाने आंदोलक आणि राज्य सरकार दोघांना फटकारले. त्यानंतर सरकारने आंदोलन मिटविण्यासाठी हालचाली करण्यास सुरुवात केली.

मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकांचा रतीब सुरु झाला. उपसमितीत अजित पवार गटाकडून क्रीडामंत्री माणिक कोकाटे यांचा समावेश आहे. सिन्नर विधानसभा मतदारसंघातही एक आक्रमक मराठा नेता हीच कोकाटे यांची ओळख आहे. महायुती पुन्हा सत्तेत आल्यावर कोकाटे यांना कृषिमंत्रीपद मिळाले. परंतु, रोखठोक स्वभावामुळे कोकाटे हे वारंवार वादग्रस्त ठरले. त्यांच्या शेतकऱ्यांविषयीच्या विधानांमुळे विरोधकांना टीका करण्यासाठी आयतेच कोलीत मिळू लागले. तरीही अजित पवार यांनी कोकाटे यांच्यावरील आपला विश्वास ढळू दिला नाही. त्यानंतर विधिमंडळातील चर्चित रमी प्रकरणाने खळबळ उडवून दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. कोकाटे यांची आता मंत्रिमंडळातून गच्छंती होणार, असाच अंदाज अनेकांनी लावला होता. चहुबाजूंनी टिकेचा भडीमार होत असतानाही अजित पवार हे भक्कमपणे कोकाटे यांच्या पाठीशी उभे राहिले. कृषिमंत्रीपद काढून त्यांच्याकडे क्रीडामंत्रीपद दिले, एवढाच काय तो बदल अजित पवार यांनी केला.

जरांगे यांच्याशी मंत्रिमंडळ उपसमितीने चर्चा सुरु केल्यावर त्यात अजित पवार गटाचे प्रतिनिधी म्हणून माणिक कोकाटे यांनीच भूमिका बजावली. त्यामुळे कोकाटे हे पुन्हा एकदा राजकीय जम बसविण्यात बऱ्यापैकी यशस्वी होत असल्याचे दिसत आहे. अजित पवार यांनी वारंवार टाकलेल्या विश्वासाचा उल्लेख माणिक कोकाटे यांनी मागील आठवड्यात नाशिक येथे झालेल्या नागरी सत्कारवेळीही केला होता. अजित पवार यांच्यामुळेच आज आपण या पदापर्यंत पोहचल्याचे त्यांनी सांगितले होते. आता क्रीडामंत्री म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटविण्यासाठी कोकाटे हे तयार झाले आहेत.