नाशिक – शहरात रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र वा पोत ओरबाडून नेण्याच्या घटना दिवसागणिक वाढत असतानाच त्याची झळ आता दस्तुरखुद्द केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या मातोश्रींना बसली आहे. आरटीओ कॉर्नर परिसरातील दुर्गानगर भागात दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी सुमारे ५० हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत हिसकावून नेली.
मागील काही वर्षांपासून सोनसाखळी खेचण्याच्या घटनांचा आलेख उंचावत आहे. कधीकधी एकाच दिवशी वेगवेगळ्या भागांत दोन, तीन घटनाही घडतात. दुचाकीवर येणारे चोरटे पादचारी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी, मंगळसूत्र खेचून पसार होतात. जबरी चोरीच्या अशा काही घटनांमध्ये संशयितांचा छडा लागतो तर अनेक प्रकरणात ते सापडत नाहीत. आजवर या प्रकारे लाखो रुपयांचे सोने लंपास झाल्याचे चित्र आहे. या घटनाक्रमात नवीन अध्याय जोडला गेला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या मातोश्री शांताबाई बागूल (७३) यांच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरट्यांनी खेचून नेली.
हेही वाचा – केंद्रीय मंत्र्यांच्या आईला भररस्त्यात लुटलं, नाशिकमधील धक्कादायक प्रकार
बागूल या दुर्गानगर परिसरातील मातृमंगल बंगल्यात राहतात. पेठ रस्त्यावरील आरटीओ कॉर्नर चौकातील बाजारात भाजीपाला घेण्यासाठी त्या गेल्या होत्या. तेथून घराकडे पायी परतत असताना ही घटना घडली. दुर्गानगर येथून पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून नेली. अकस्मात घडलेल्या या प्रकाराने बागूल या भयभित झाल्या. संशयित दुचाकीवर हळू जवळ आले. त्यांना काही माहिती विचारायची असेल असे वाटले. पण क्षणार्धात त्यांनी आपली सोन्याची पोत काढून नेली. रस्त्यावर फारशी वर्दळ नसल्याने कुणाला मदतीसाठी बोलावता आले नाही. आपणास काही सुचत नव्हते, असे बागूल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.