नाशिक : शहरी भागातून दुचाकी चोरुन त्यांची जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात विक्री करण्यात येत असल्याचे उघड झाले असून चोरीच्या दुचाकींची खरेदी करणाऱ्यांवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी कारवाई करीत १० दुचाकी जप्त केल्या.

पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे अभिलेखावरील गुन्हेगारांची माहिती काढण्याचे पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेला सूचना केल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकातील अधिकारी अंमलदार हे घोटी – सिन्नर महामार्गावर गस्त घालत असतांना एका विना क्रमांकाच्या दुचाकीवर एक जण सिन्नरकडे भरधाव येतांना दिसला. त्यास अडवून दुचाकीची नंबरपट्टी आणि कागदपत्रांविषयी विचारणा करण्यात आली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे सुरज सातपुते (२८, रा. घोडेचाळ) याला ताब्यात घेतले.

सुरजची सखोल चौकशी केली असता त्याचा मित्र रोहित पवार (२७ रा. वांजुळफुई) याने दुचाकी दिल्याचे सांगितले. रोहित पवार यास ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने जिल्हाचा सीमावर्ती भाग कोपरगाव, शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर या शहरांच्या परिसरातून दुचाकींची चोरी करून नाशिक शहर, इगतपुरी तालुका, नाशिकरोड तसेच अतिदुर्गम भागात विकल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीच्या १० दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. या चोरीच्या दुचाकी विनानंबरपट्टी आणि कागदपत्रांविना खरेदी करणाऱ्या आठ जणांविरुध्द कारवाई करण्यात आली. घोटी पोलीस ठाण्यात संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित पवार हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे. चोरीचे एकूण सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना एखादी व्यक्ती नंबरपट्टी नसलेली किंवा कागदपत्र नसलेली दुचाकी कमी किंमतीत विकत असेल तर अशा व्यक्तीची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यात द्यावी. कोणीही चोरीच्या दुचाकी खरेदी अथवा विक्री करू नये. असे आढळून आल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. दुचाकी चोरीचे प्रमाण रोखण्यासाठी नागरिकांनी आपल्या दुचाकीला हॅन्डल लॉक, व्हिल लॉक, सेफ्टी लॉक बसवून योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.