नाशिक : जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. घरांचे पत्रे उडाले. सुरगाणा तालुक्यात अंगणवाडी केंद्राचे नुकसान झाले. चांदवड तालुक्यात गारांसह जोरदार पाऊस झाला. मालेगाव तालुक्यात सायंकाळी १५ मिनिटे वावटळीमुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसाने कांद्यासह आंब्यांचे नुकसान झाले. सोमवारी काही गावात पाऊस व गारपीट झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळपासून उन्हाचा कडाका जाणवत होता. दुपारनंतर ढगाळ वातावरण झाले. वाऱ्याचा वेग वाढला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने सुरगाणा, येवला, त्र्यंबकेश्वर, येवला, निफाड, कळवण आदी तालुक्यात नुकसान झाले.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सुरगाण्यातील चिंचले येथील मंगळू पाडवी, नरेश पाडवी यांच्या घरांचे पत्रे वादळी वाऱ्यात उडाले. याच भागातील मौजे वाघदौंड येथील अंगणवाडी केंद्राचे वादळी वाऱ्याने नुकसान झाले. पेठ, सुरगाणा भागात आंब्यांचे नुकसान झाले. येवला तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. कळवण तालुक्यात सप्तश्रृंगी गडावर पावसाने हजेरी लावली. चांदवड तालुक्यात काही भागात जोरदार पाऊस झाला. निफाड, नांदगाव तालुक्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. काही ठिकाणी जोरदार पावसासह गारपीट झाली. काढणीवर आलेल्या व शेतात काढून ठेवलेल्या कांद्याला हा पाऊस नुकसानकारक ठरला.
वादळामुळे वीज पुरवठा खंडित
मालेगाव तालुक्यात वावटळीमुळे अनेक ठिकाणचे वृक्ष उन्मळून पडले. धुळीच्या वादळाचा एवढा जोर होता की,घराबाहेर असलेले नागरिक तसेच रस्त्यावरील वाहनचालकांची त्यामुळे दाणादाण उडाली. बराच वेळ हे वादळ सुरू असल्याने लोकांना भीतीपोटी सुरक्षित जागेचा आसरा घ्यावा लागला. सध्या लग्नसराईचा हंगाम आहे. त्यानुसार शहरात अनेक ठिकाणी मांडव तसेच लग्न समारंभांचे आयोजन केले होते. अचानक आलेल्या वावटळीमुळे काही ठिकाणी मंडप उडाले. वादळामुळे शहरातील विद्युत पुरवठा देखील खंडित झाला. याच सुमारास म्हाळदे शिवारातील कचरा डेपोला लागलेल्या आगीची व्याप्ती वादळामुळे आणखी वाढत गेली. काही वेळानंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले