मनमाड : शहरातील इंडियन हायस्कूलची दहावी अ या तुकडीतील विद्यार्थिनी गौरी खरात हिचे एप्रिल महिन्यात निधन झाले. दहावीच्या निकालात ती उत्तीर्ण झाली, उत्तीर्ण झालेली गौरी आज आपल्यात नसल्याची बाब विद्यालयातील तिच्या वर्गशिक्षिका प्रेमलता गायकवाड यांच्यासह सर्वच शिक्षकांना चटका लावून गेली. ‘तुमची गौरी दहावीची परीक्षा पास झाली’ हे शब्द परिस्थितीने गांजलेल्या गरीब आईच्या कानावर पडताच त्यांनी अक्षरशः टाहो फोडला. हा निकाल बघायला व शाळेतून महाविद्यालयीन जगात प्रवेश करायला गौरी जगात होतीच कुठे ? मंगळवारी दहावीचा निकाल लागल्यावर दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या घरात आनंदोत्सव साजरा झाला.
मनमाडच्या गायकवाड चौकातील खरातांचे घर प्रतिकूल परिस्थितीत कन्या दहावी उत्तीर्ण झाल्याचे कळूनही दुःखात बुडाले होते. दहावीची परीक्षा दिल्यानंतर अवघ्या काही दिवसांत किरकोळ कारणाने गौरीने आत्महत्येचे पाऊल उचलले होते. निकालाच्या दिवशी घरात नव्हे, तर या जगातच गौरी नसल्याची भावना कुटुंबियांना हेलावणारी ठरली. मोलमजुरी करणारे खरात दाम्पत्य मुलीला शिकवून घरातील गरिबीचे दिवस जातील, याची आस लावून बसले होते. पण, मुलगी अचानक गेली. आणि आशेवर पाणी फेरले गेले.