त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे शिवारात काही दिवसांपूर्वी बिबट्याने सहा वर्षाच्या बालकावर हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने बालकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वन विभागाने परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. ग्रामस्थांनी या परिसरात अजूनही दोन ते तीन बिबटे असल्याचा दावा केला आहे.

हेही वाचा- जिंदाल कारखान्यातील स्फोटात दोन महिला दगावल्या ;नाशिकमधील दुर्घटनेत १७ जखमी

१० दिवसांपूर्वी वेळुंजे येथील निवृत्ती दिवठे यांचा मुलगा आर्यन यास बिबट्याने त्याच्या राहत्या घरापासून जंगलात फरफटत नेले होते. त्यामुळे स्थानिकांमधील रोष वाढला होता. रोजच कुणाचा बैल, बकरा, कुत्रे, कोंबडे, याचा फडशा पाडण्याचे काम बिबट्याने सुरु केल्याने परिसरातील ग्रामस्थ दहशतीखाली होते. वारंवार होणाऱ्या घटनांमुळे वन विभागातील कर्मचारी, अधिकारीही अस्वस्थ होते. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने परिसरात अनेक ठिकाणी पिंजरे लावले होते. सोमवारी एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला. वन विभागाला एक बिबट्या पकडण्यात यश आले असले तरी या परिसरात अजून दोन ते तीन बिबटे असल्याचा अंदाज स्थानिकांकडून वर्तविला जात आहे. वेळुंजे, धुमोडी, गणेशगाव या परिसरात एकूण सहा पिंजरे लावण्यात आले आहेत. नाशिक प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाने, त्र्यंबकेश्वरचे राजेश पवार, इगतपुरीचे केतन बिरारी, वन परिमंडळ अधिकारी अरुण निंबेकर आदी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

हेही वाचा- Jindal fire accident : आगीच्या कारणांचा शोध सुरू, चौकशीअंती गुन्हा दाखल होणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिसरातील जंगल हे मोठे वृक्ष नसले तरी गलतोरा, जांभुळ, करवंदांची जाळी, आंबा अशी कित्येक झाडे असल्याने खूप दाट आहे. यामुळे या ठिकाणी अनेक वन्य प्राणी, पक्षी आहेत. या जंगलाचे वणव्यांपासून संरक्षण होण्यासाठी कुंपण तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे आहे, अशी माहिती वेळुंजचे माजी सरपंच समाधान बोडके यांनी दिली.