जळगाव : एकनाथ खडसे पक्षातून बाहेर पडल्यापासून जिल्ह्यातील भाजपमध्ये सध्या गिरीश महाजन यांचीच चलती आहे. लोकसभेसह विधानसभेतील यशानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची सर्व सूत्रे महाजन यांच्याकडेच आहेत. अर्थात, जळगावसह नाशिक ताब्यात ठेवण्यात यशस्वी ठरल्यानंतर त्यांनी जिल्ह्यासाठी आपला राजकीय वारसदारही निश्चित केल्याचे दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यभरातील जिल्हा निवडणूक प्रमुख व निवडणूक प्रभारी यांच्या नियुक्त्यांची घोषणा केली आहे. या घोषणेमध्ये मंत्री गिरीश महाजन यांचा ठसा स्पष्टपणे दिसून येत आहे. पक्षाच्या निवडणूक व्यवस्थापनात त्यांचा प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
मंत्री महाजन यांनी स्वतः नाशिक शहर, नाशिक उत्तर-दक्षिण आणि मालेगाव, या तीनही महत्त्वाच्या मतदारसंघांची निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. त्या भागातील राजकीय समीकरणे लक्षात घेता ही जबाबदारी महाजन यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. नाशिक विभागात भाजप बळकट करण्यासाठी आणि संघटनात्मक पातळीवर मजबूत तयारी करण्यासाठी महाजन स्वतः मैदानात उतरले आहेत. नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटला नसताना मित्र पक्ष शिंदे गटासह अजित पवार गटाला शह देण्याची संधी महाजन या निमित्ताने साधणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील जबाबदाऱ्या वाटप करताना मंत्री महाजन यांनी आपले विश्वासू सहकारी आणि स्थानिक नेत्यांना महत्त्वाच्या भूमिका दिल्या आहेत. जळगाव शहर, जळगाव पूर्व आणि जळगाव पश्चिम या तीन प्रमुख मतदारसंघांच्या निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी त्यांनी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडे सोपवली आहे. तसेच, जळगाव जिल्ह्यातील पक्ष संघटन समन्वय राखण्यासाठी भाजप आमदार सुरेश भोळे यांच्याकडे जळगाव शहर निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी दिली आहे. रावेर मतदारसंघाचे ज्येष्ठ पदाधिकारी नंदू महाजन यांना जळगाव पूर्व मतदारसंघाची धुरा देण्यात आली आहे, तर चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे जळगाव पश्चिम मतदारसंघाची निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नियुक्त्यांच्या माध्यमातून मंत्री महाजन यांनी केवळ स्वतःच्या प्रभाव क्षेत्रावर नियंत्रण राखलेले नाही, तर आपल्या जवळच्या आणि विश्वासार्ह कार्यकर्त्यांना निवडणूक व्यवस्थापनातील प्रमुख पदे देऊन पक्षाची सूत्रे आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
मंत्री महाजन यांच्यासोबत सावलीसारखे वावरणारे चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीत जळगाव मतदारसंघाची जबाबदारी समर्थपणे पेलली होती. ठाकरे गटाचे मोठे आव्हान असतानाही भाजप उमेदवार स्मिता वाघ मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. त्यानंतर आता आमदार चव्हाण यांच्याकडे जळगाव लोकसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची सूत्रे सोपविण्यात आली आहे. मंत्री महाजन यांना नाशिकच्या जबाबदारीमुळे जळगावकडे फार लक्ष देणे शक्य होणार नाही. त्यामुळे आमदार चव्हाण यांनाच आता मंत्री गिरीश महाजन यांचे राजकीय वारसदार म्हणून जळगाव जिल्हा परिषदेसह, पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकवण्याची मोहीम फत्ते करावी लागणार आहे.
