जळगाव – अमळनेर येथे होणार्‍या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते होणार आहे. याबाबत त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषाताई तांबे यांना पत्र पाठवून स्वीकृती कळवली असल्याची माहिती संमेलनाचे समन्वयक प्रा. डॉ. नरेंद्र पाठक आणि मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी दिली.

अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात साकारत असलेल्या पूज्य साने गुरुजी साहित्यनगरीत दोन ते चार फेब्रुवारी या कालावधीत ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. संमेलन समारोपास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत, तसेच संमेलनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी येण्याचे मान्य केले आहे.

संमेलनाची जय्यत तयारी सुरू असून, संमेलनाचा उत्साह संपूर्ण खान्देशात दिसून येत आहे. याच पार्श्‍वभूमीवर संमेलनाचे निमंत्रक तथा मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी महाविद्यालयात जाऊन युवक-युवतींशी संवाद साधला. संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीश महाजन, प्रमुख संरक्षक व सल्लागार तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, संरक्षक व सल्लागार तथा जैन उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोक जैन हेदेखील संमेलनाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न करत असल्याचे डॉ. अविनाश जोशी यांनी सांगितले.

हेही वाचा : पुण्यातील नाट्य संमेलनात शरद पवार म्हणाले, “इतिहासाचा विपर्यास करणारी नाटके…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संमेलनासाठी कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. प्रताप महाविद्यालयात उभारण्यात येत असलेल्या साने गुरुजी साहित्यनगरीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. वेगवेगळ्या सभागृहांची आखणी, ग्रंथप्रदर्शन दालन उभारणी जागेचे सपाटीकरण, परिसरातील अंतर्गत रस्ते बांधकाम, स्वच्छतागृह उभारणी, वाहनतळ व्यवस्था आदी कामे जोमाने सुरू असल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले.