नंदुरबार: हिंदी भाषेसंदर्भातील निर्णय मागे घेण्यात आल्याने विरोधकांना एक वर्षांनंतर विजय साजरा करण्याची संधी मिळाली. अशी संधी मिळण्याची विरोधक वाट पाहत होते. मात्र याचा विरोधकांना राजकीय लाभ होणार नाही, असा दावा राष्ट्रवादीचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केला आहे. ठाकरे बंधू एकत्र आले तरी त्यामुळे अजित पवार गटाचे कुठलेही नुकसान होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, तटकरे यांच्या उपस्थितीत नंदुरबारमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा घेण्यात आला. मेळाव्यानंतर खासदार तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी हिंदी भाषेच्या मुद्यावरुन ठाकरे बंधू आयोजित करीत असलेल्या विजयी मेळाव्यावर टीका केली.
या मेळाव्याच्या माध्यमातून त्यांना वर्षभरात विजय साजरा करण्याची संधी मिळाली असली तरी याचा राजकीय फायदा त्यांना होणार नसल्याचे तटकरे म्हणाले. दोन्ही ठाकरे एकत्र आले तरीही राष्ट्रवादीचे कोणतेही राजकीय नुकसान होणार नसल्याचे त्यांनी नमूद केले.
आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांसंदर्भात केलेले भाष्य योग्य नसून शेतकऱ्यांविषयी असे कोणीही बोलू नये, असे तटकरे यांनी नमूद केले. या मुद्यावरुन लोणीकरांनी आपली बाजू मांडली असल्याचे सांगत त्यांनी अधिकचे बोलणे टाळले. आदिवासी विकास विभाग तसेच सामाजिक न्याय विभागाचा कुठलाही निधी कमी झाला नसून उलट मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या नेतृत्वात या विभागांना अधिकचा निधी दिला गेला आहे.
या मुद्यावरुन विरोधक जनतेची दिशाभूल करीत आहेत. राज्याची तिजोरी उत्तम स्थितीत असून सर्व योजना सुरळीत राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा निर्णय देखील सरकार योग्य वेळी घेईल, असे तटकरे यांनी सांगितले.
यावेळी तटकरे यांच्यासमवेत रुपाली चाकणकर, आमदार अनिल पाटील, सुरज चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पाटील, भरत गावित, रतन पाडवी यांच्यासह प्रदेश आणि जिल्ह्यातील स्थानिक नेते उपस्थित होते.